Thu, Jun 20, 2019 21:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › शाळेत असताना मला संगीत शिकता आले नाही!

शाळेत असताना मला संगीत शिकता आले नाही!

Published On: Feb 01 2018 1:36AM | Last Updated: Feb 01 2018 1:26AMमुंबई : प्रतिनिधी

लहान असताना आमची आर्थिक स्थिती वाईट होती. आई वारली होती. मी नातेवाईकांकडे वाढत होतो. वडील दुसरीकडे रहायचे. संगीताची खूप आवड असूनही मला आर्थिक स्थितीमुळे लहान वयात संगीत शिकता आलं नाही, अशा शब्दांत हिंदी-उर्दू कवी, साहित्यिक व अनेक हिंदी सिनेमांचे ख्यातनाम गीतकार जावेद अख्तर यांनी आपल्या मनातील खंत व्यक्त केली. 

शंकर महादेवन अकादमीच्या वतीने राबविण्यात येणार्‍या इन्स्पायर इंडिया या उपक्रमाचा शुभारंभ बुधवारी सायन येथील डी. एस. हायस्कूलमध्ये झाला. त्यावेळी उदघाटक म्हणून जावेद अख्तर  या कार्यक्रमात बोलत होते.

तळागाळातील तसेच आर्थिकदृष्ट्या निम्न वर्गातील शालेय विद्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण मिळावे, त्यांच्यात संगीताची आवड निर्माण व्हावी या हेतूने इन्स्पायर इंडिया हा उपक्रम मुंबईत अनेक ठिकाणी राबविण्यात येणार आहे. 

विद्यार्थ्यांना संगीताचं प्रशिक्षण देण्यासाठी शाळेतील प्रयत्न चांगले आहेत. त्यातून भविष्यात संगीतविश्वातील महावृक्षनिर्माण होणार आहेत असेही जावेद अख्तर म्हणाले.

शालेय जीवनात पैसे नाहीत म्हणून संगीतापासून कुणीही वंचित राहू नये, ही आमची यामागची भावना आहे, अशी माहिती बॉलीवडचे सुप्रसिद्ध गायक-संगीतकार व  इन्स्पायर इंडियाचे संस्थापक शंकर महादेवन यांनी यावेळी दिली. 

तर डी. एस. हायस्कूलचे मुख्य विश्वस्त राजेंद्र प्रधान म्हणाले, शाळेतील मुलांना गेल्या दीड वर्षापासून शंकर महादेवन यांच्या मार्गदर्शनाखाली संगीताचे प्रशिक्षण मिळत आहे. संगीतामुळे विद्यार्थ्यांचा मानसिक ताण तर कमी होतोच, पण त्याचबरोबर त्यांच्यातील अभ्यासेतर गुणांना प्रोत्साहनही मिळते. पियानो, गिटार, तबला, हार्मोनियम अशा सर्वच वाद्यांनी सुसज्ज अशा आमच्या शाळेतील संगीतवर्गाचा लाभ आज शेकडो विद्यार्थी घेत आहेत अशी माहिती त्यांनी दिली.