होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परेलचा पूल अखेर बंद!

लोअर परेलचा पूल अखेर बंद!

Published On: Jul 25 2018 1:57AM | Last Updated: Jul 25 2018 1:54AMमुंबई : प्रतिनिधी

दक्षिण मध्य मुंबईतील लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून दुरुस्तीच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचार्‍यांना आपले नोकरीचे ठिकाण गाठावे लागत आहे. मंगळवार सकाळपासूनच पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरीकेड्स लावत पूल बंद ठेवण्यात आला. मात्र हा पूल बंद करण्यासंदर्भात पूर्वकल्पना देण्यात न आल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणचा लोअर परेल पूल अचानक बंद करण्यात आल्याने पादचार्‍यांची धांदल उडाली. सकाळी-सकाळीच कार्यालयांत जाण्यासाठी घाईघाईत निघालेली ही मंडळी पूल बंद असल्याने अवाक् झाली. तरीही वेळेत ऑफिस गाठण्यासाठी पुलावरची कसरत या कर्मचार्‍यांना करावी लागली. गर्दीतून मार्ग काढताना सर्वांचीच दमछाक झाली. पण, यापूर्वी घडलेल्या पूल दुर्घटनांमधून मुंबईकर बरेच काही शिकला असल्याने ते या गर्दीतून शांततेने मार्ग काढत होते. लोअर परेलचा पूल बंद असल्याने केवळ पादचार्‍यांनाच नाही, तर चारचाकीतून प्रवास करणार्‍यांनाही ट्रॅफिक जामचा फटका बसला आहे. 

लोअर परेल भागामध्ये अनेक कार्यालये असल्याने हजारोंच्या संख्येने रोज इथे लोक येतात. मात्र लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी फक्त एकच पूल उपलब्ध असून तोही अरुंद आहे. त्यातही हा पूल उतरल्यानंतर खालच्या बाजूला मोकळा रस्ता नसून अरुंद गल्ली आहे. या गल्लीतही अनेक ठिकाणी बाईक पार्क असल्याने प्रवाशांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. या सगळ्या गोंधळामुळे तिथे पोलीस नियुक्त करण्यात आले आहेत. तरीही या ठिकाणाहून बाहेर निघण्यासाठी 25 ते 30 मिनिटे लागत आहेत.

काही आठवड्यांपूर्वी अंधेरीमधील गोखले पुलाचा स्लॅब रेल्वे ट्रॅकवर कोसळल्याने रेल्वे प्रशासन, आयआयटी मुंबई आणि महापालिकेतील अधिकार्‍यांनी एकत्रितपणे रेल्वे पुलांचे ऑडिट केले. यानंतर लोअर परेल येथील रेल्वेचा पूल धोकादायक असल्याचा निष्कर्ष निघाल्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी तत्काळ बंद कऱण्यात यावा, असा आदेश देण्यात आला. त्यानंतर मंगळवारी हा पूल बंद करण्यात आला असून त्याच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.