Mon, Aug 19, 2019 09:43होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोअर परळ येथील पुलाचा तिढा सुटला

लोअर परळ येथील पुलाचा तिढा सुटला

Published On: Aug 24 2018 1:22AM | Last Updated: Aug 24 2018 1:05AMमुंबई : प्रतिनिधी 

लोअर परळ येथील पुलाचा आराखडा रेल्वे तयार करणार असून, जो भाग महापालिकेच्या हद्दीत येतो त्याचे बांधकाम पालिका तर रेल्वे हद्दीतील काम रेल्वे करेल, असे स्पष्ट करत रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितीत हा तिढा अखेर सुटला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशीष शेलार यांच्या नेतृत्वात भेटलेल्या शिष्टमंडळाला ही माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली.

लोअर परळ येथील धोकादायक पूल पाडण्याचे काम सुरू असून, हा पूल नेमका कुणी बांधावा याबाबत पालिका आणि रेल्वेमध्ये तू-तू मै-मै सुरू होती. हा पूल मुंबईकरांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे त्याच्या कामात कोणताही विलंब होऊ नये म्हणून शेलार यांनी गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन या पुलाचे काम कालबध्द पध्दतीने करण्यात यावे, अशी मागणी केली होती. तर आज मुंबई भेटीवर असलेल्या रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची शेलार यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने भेट घेतली. हा पूल वाहतुकीच्या दुष्टीने महत्त्वाचा असल्यामुळे त्याचा निर्णय तातडीने व्हावा, अशी विनंती त्यांनी पुन्हा रेल्वे मंत्र्यांना केली. या शिष्टमंडळामध्ये शिवडी मंडळ अध्यक्ष अरुण दळवी, जिल्हा सरचिटणीस सतीश तिवारी, राजन घाग, नितीन पवार, विश्वनाथ तोरसकर आणि लालबाग, परळ मधील अन्य पदधिकार्‍यांचा समावेश होता.