Wed, Nov 14, 2018 08:03



होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रेयसीसोबत भांडण झाल्याने प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने प्रियकराची रेल्वेखाली आत्महत्या

Published On: Aug 01 2018 1:31AM | Last Updated: Aug 01 2018 1:23AM



डोंबिवली : वार्ताहर

प्रेयसीसोबत भांडण झाल्याने प्रियकराने धावत्या रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची घटना विठ्ठलवाडी स्थानकात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी प्रियकराने मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढला. त्याच्या आत्महत्येचे कारण सांगितल्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. राजेश भंडारी असे आत्महत्या करणार्‍या प्रियकराचे नाव आहे.

मृत राजेश हा कल्याण-कसारा मार्गावरील आंबिवली स्टेशनजवळच्या मोहने गावात राहणारा होता. त्याचे त्याच परिसरातील एका तरुणीशी गेल्या 5 वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांच्या घरी यांच्या प्रेमसंबंधाची खबर लागल्याने तरुणीच्या घरच्यांनी आधी विरोध केला होता. तरीही या दोघांचे प्रेमसंबंध सुरूच होते. त्यानंतर दोघांच्या घरच्यांच्या सहमतीने त्यांचे लग्नही होणार होते. मात्र, गुरुवारी 26 जुलैला प्रेयसीने राजेशला विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशनवर भेटण्यासाठी बोलावले होते. त्यावेळी राजेश या ठिकाणी गेला असता, दोघांमध्ये काही कारणावरून जोरदार वाद झाल्याने रेल्वे स्टेशन परिसरात गोंधळ उडाला होता. हा गोंधळ पाहून पोलीस कर्मचार्‍यांनी घटनास्थळी येऊन दोघांनाही तेथून हुसकावून लावले. त्यानंतर राजेशने सेल्फी व्हिडिओ काढून स्वतःला ट्रेनखाली झोकून दिले.या घटनेची कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. मात्र अद्याप कुणाच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

प्रेयसीच्या छळाला कंटाळल्याचा आरोप

प्रियकर-प्रेयसीमध्ये वाद झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना शांत केले व हुसकावून लावले. त्यानंतर काही वेळाने राजेशने स्वत:च्या मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडीओ काढला. त्यामध्ये त्याने मी विठ्ठलवाडी स्टेशनजवळ उभा असून प्रेयसीच्या छळाला कंटाळून रेल्वेखाली आत्महत्या करीत आहे. या मोबाईलमध्ये असलेला लॉककोड माझ्या मित्राला माहिती आहे असे सांगितले होते. हाच सेल्फी व्हिडिओ व्हायरल झाला आहे.