होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गर्भधारणेच्या नावाखाली लूट : भोंदू महिलेला अटक

गर्भधारणेच्या नावाखाली लूट : भोंदू महिलेला अटक

Published On: Jan 11 2018 1:31AM | Last Updated: Jan 11 2018 12:44AM

बुकमार्क करा
नालासोपारा : वार्ताहर

विरार पूर्वेतील एका भोंदू महिलेने  कृष्णाची पूजा करून आयुर्वेदीक औषधांनी गर्भधारणा घडवून आणण्याचा दावा करून फसवणूक केल्याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून मंगळवारी विरार पोलिसांनी भोंदू महिलेला अटक केली. सुजाता खांडेकर असे तिचे नाव आहे.

मनवेलपाडा येथे राहणार्‍या फिर्यादी महिलेच्या लग्नाला अनेक वर्षे होऊनही तिला मूल झाले नाही. यावर तिच्या शेजार्‍याने या परिसरात राहणार्‍या सुजाता खांडेकर या महिलेशी ओळख करून दिली. सुजाताने अनेकांना औषधे दिली असून त्यांना मुले झाल्याचे त्याने सांगितले.  शेजारच्या व्यक्तीच्या बोलण्यावर विश्‍वास ठेऊन पीडित महिला 27 जून 2016 रोजी सुजाताच्या घरी गेली. तेव्हा सुजाताने तिची ओटी भरून कृष्णाची मूर्ती देऊन तिची पूजा करण्यास सांगितले. यासाठी तिने 5700 रूपये घेतले. त्यानंतर पुन्हा बोलावून तुमच्यावर करणी केली असल्याची बतावणी करून वारंवार पैसे उकळले. हे सर्व करूनही गर्भधारणा झाली नाही. या नादात पीडितेचे सुमारे 2 लाख रुपये संपले. 

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर पीडितेने अन्य चार फ सवणूक झालेल्या महिलांसह सोमवारी विरार पोलीस ठाणे गाठून सुजाताविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सुजाता खांडेकर ऊर्फ स्मिता कोचरेकर हिला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली. सुजाता या भागात इस्टेट एजंट म्हणूनही काम करत असून घर देण्याच्या नावाखालीही तिने अनेकांची फसवणूक केल्याचे पोलिसांनी सांगितले.