Fri, Jul 19, 2019 13:29होमपेज › Mumbai-Thane-Raigad › संपाच्या नावाखाली किरकोळ व्यापार्‍यांकडून लूट

संपाच्या नावाखाली किरकोळ व्यापार्‍यांकडून लूट

Published On: Jun 05 2018 1:37AM | Last Updated: Jun 05 2018 1:28AMमुंबई : संजय गडदे

राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या शेतकरी संपाचा शहरांवर फारसा परिणाम झाला नाही. राजधानी मुंबईतील कायम गजबजलेल्या नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती आणि दादरच्या भाजी मंडईवरही शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवलेला नाही. भाज्यांची आवक व्यवस्थित सुरू आहे. महत्त्वाचे म्हणजे शनिवारच्या तुलनेत काहीसे भाव कमी झाले आहेत. मात्र किरकोळ बाजारात व्यापार्‍यांकडून शेतकरी संपाच्या नावाखाली लूट होत असल्याचे चित्र मुंबईत सर्वत्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी संपाच्या नावाखाली भाज्यांचे भाव वाढवून सांगत असतील, तर त्यावर विश्वास ठेवू नका.... योग्य दराने भाजी खरेदी करा, असे आवाहन वाशी बाजारातील व्यापारी करत आहेत. 

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाज्यांची आवक नेहमीप्रमाणेच झाली आहे. त्यामुळे या बाजार समितीत शेतकरी संपाचा कुठलाही परिणाम जाणवलेला नाही. सोमवारी सायंकाळपर्यंत वाशीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डात राज्याच्या विविध भागातून भाजीपाल्याच्या 613, कांदा-बटाट्याच्या 260, फळांच्या 523, मसाल्याच्या 192 आणि धान्याच्या 359 गाड्यांची आवक झाली आहे. शिवाय राज्याबाहेरील कर्नाटक, इंदोर, गुजरातमधूनही भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र सोमवारी पाहायला मिळाले. त्यामुळे घाऊक बाजारात भाज्यांचे दर स्थिर आहेत. 

मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या शेतकरी आंदोलनाला धार नसल्याने भाजीपाल्याची आवक मात्र सुरळीत आहे. तरी मात्र संपाचा फायदा सामान्यांना लुटण्याची वृत्ती असणारे काही किरकोळ व्यापारी घेत असून भाजीपाला चढ्या दराने विकत आहेत. अशा परिस्थितीत ग्राहक व्यापारी वर्गाला शिव्या घालत आहे.

शेतकरी संपात फूट

दरम्यान, 1 जूनपासून शेतकरी संपाला सुरुवात झाली असून संपामध्ये फूट पडल्याचे वृत्त आहे. शेतकरी संघर्ष कृती समितीच्या वतीने सरकारला 5 जूनचा अल्टिमेटम देण्यात आला होता. सरकारविरोधात पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा इशारा शेतकरी संघर्ष कृती समितीने दिला असून सरकारकडून या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. तर सात जून रोजी शहराकडे जाणारे दूध आणि शेतीमाल थांबवण्यात येईल. यानंतरही सरकारला जाग आली नाही तर 10 जूनला देशभरातील शेतकरी चक्का जाम आंदोलन करतील असा इशारा कृती समितीने दिला आहे. मात्र दुसरीकडे प्रस्थापित नेत्यांनी या संपाला विरोध केला असल्याने संपात फूट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.        

मागणी अभावी डाळींब, अननसच्या भावात घसरण, उर्वरित सर्व फळे स्थिर

रमजानचे उपवास सुरू असल्यामुळे फळांना वाढलेली मागणी कायम आहे. त्यातच पाऊस, शेतकर्‍यांनी पुकारलेल्या बंदामुळे फळांची आवक जरा घटली होती. कलिंगड, खरबुज, पपई, पेरु आणि लिंबांच्या भावात सुमारे 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर, मागणी घटल्याने डाळींब, अननस यांच्या भावात काही प्रमाणात घसरण झाली आहे. उर्वरित सर्व फळांचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापार्‍यांनी दिली. 

सोमवारी मार्केट यार्डातील फळ विभागात अननसची 7 ट्रक, मोसंबीची 15 ते 20 ट्रक, संत्रीची 2 ट्रक, डाळिंबाची 25 ते 30 ट्रक, पपई 2 ते 3 टेम्पो, लिंबाची 2 हजार गोणी, चिक्कू 2 हजार डाग, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबूज 10 ते 15 टेम्पो इतकी आवक झाली. फळबाजारात सर्व प्रकारच्या एकूण 523 गाड्यांची आवक झाल्याने दर नियंत्रणात आले. 

शेतकरी संप आणखी तीव्र होणार?

गेल्या वर्षी झालेल्या शेतकरी आंदोलनांनंतर सरकारने दिलेली आश्वासने हवेतच विरल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये फसवणूक आणि संतापाची भावना आहे. शुक्रवारी अनेक ठिकाणी हजारो लिटर दूध रस्त्यावर ओतून आणि भाजीपाला रस्त्यावर टाकून शेतकर्‍यांनी आपल्या संतापाला वाट करून दिली. मंगळवारपासून  हा संप आणखी तीव्र केला जाणार आहे. 6 व 7 जूनला शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्यांना भाजीपाला पाठविणार नाही. त्यामुळे राज्यात बाजार समित्या बंदच ठेवल्या जाणार असल्याची माहिती किसान क्रांती जनआंदोलनाच्या कोअर कमिटीच्या सदस्यांनी दिली. त्यामुळे या संपाची तीव्रता आणखी वाढणार आहे.