Tue, Feb 19, 2019 06:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नाशिक ते मुंबई शेतकर्‍यांचा लाँग मार्च

नाशिक ते मुंबई शेतकर्‍यांचा लाँग मार्च

Published On: Feb 22 2018 1:25AM | Last Updated: Feb 22 2018 1:25AMमुंबई :  प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे 6 मार्चला एक लाख शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. हा मोर्चा मुंबईत 12 मार्चला पोहचेल त्यानंतर शेतकरी विधानभवनाला घेराव घालतील, अशी घोषणा किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे, आ. जे.पी.गावीत, किसन गुजर व डॉ. अजित नवले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. 

सरकारी धोरणे व नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी हतबल झालेेले असून  कर्जमाफीच्या घोषणेनंतर राज्यातील तब्बल 1753 शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत. सरकारने अशा परिस्थितीत शेतकर्‍यांच्या मागे उभे राहण्याऐवजी फसव्या घोषणा केल्या.  शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबत नसल्याने शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्यासाठी किसान सभेने शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून नाशिक येथून एक लाख शेतकरी 180 किलोमीटर अंतर चालून मुंबईत येतील. शेतकर्‍यांच्या मागण्या मान्य होईपर्यंत हा घेराव बेमुदत सुरू राहील,असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. यापूर्वी, किसान सभेने मार्च 2016 मध्ये नाशिक येथे एक लाख शेतकर्‍यांचा महामुक्काम सत्याग्रह केला होता. 

किसान सभेच्या मागण्या 

स्वामिनाथन आयोगाच्या रास्त भावाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा, पुनर्वसनाचे प्रश्न निर्माण न करता पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला मिळणारे पाणी पूर्वेकडे वळवून शेतीला पाणी द्या, बोंड आळी व गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना एकरी किमान 40 हजार रुपये भरपाई द्या, कष्टकरी शेतकर्‍यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, शेतीमालाला दीडपट भावाची हमी द्या, शेतकर्‍यांचे वीजबिल माफ करा, उसाला जाहीर केलेला भाव देणे बंधनकारक करा, अशा शेतकर्‍यांच्या मागण्या आहेत.