Tue, Nov 19, 2019 11:02होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकमंगल मल्टिस्टेट गैरव्यवहार; न्यायालयीन चौकशीसाठी विरोधक आक्रमक

लोकमंगल मल्टिस्टेट गैरव्यवहार; न्यायालयीन चौकशीसाठी विरोधक आक्रमक

Published On: Jun 25 2019 3:39PM | Last Updated: Jun 25 2019 3:37PM
मुंबई : प्रतिनिधी

सोलापूरच्या लोकमंगल मल्टिस्टेट सोसायटीमधील गैरव्यवहाराच्या न्यायालयीन चौकशीसाठी विरोधकांनी विधान परिषदेत आज आक्रमक पवित्रा घेतला. गैरव्यवहार झाल्याचे सिध्द झाले असतानाही दोषी संचालकांना अटक न करता त्यांचे फक्त जबाब नोंदवले गेले. याचा अर्थ सरकार या भ्रष्टाचार्‍यांना पाठिशी घालत आहे, असा आरोप करीत विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी लावून धरली. या मागणीसाठी विरोधकांनी वेलमध्ये उतरून जोरदार घोषणाबाजी केल्याने सभागृहात गदारोळ झाला. या गोंधळामुळे सभापती रामराजे निंबाळकर यांनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.

विरोधी पक्षनेते धंनजय मुंडे यांच्यासह काँग्रेसचे शरद रणपिसे, शेकापचे जयंत पाटील यांनी या भ्रष्टाचाराप्रकरणी न्यायालयीन चौकशीच मागणी प्रश्‍नोत्तराच्या तासाला लावून धरली. ही संस्था मंत्रिमंडळातील एका मंत्र्याशी संबंधीत आहे, त्यामुळे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुंडे यांनी यावेळी केला. हे प्रकरण लोकायुक्तांकडेही गेले असून त्यांनी दुग्धविकास सचिवांवरही कडक ताशेरे ओढले असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. मात्र दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी चौकशी जाहीर करणे टाळले.

या सोसायटीने बनावट कागदपत्र तयार करून दुग्धशाळा विस्तारीकरण आणि भुकटी प्रकल्प सुरु करण्यासाठी 24 कोटी 81 लाख अनुदान मिळवले. मात्र हे लक्षात आल्यानंतर सरकारने त्यांचा प्रस्ताव रद्द करून रक्कमही वसूल केली आणि पोलिस ठाण्यात तातडीने एफआयआर नोंदवण्याच्या सूचना दिल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले. पोलिस या प्रकरणाच्या चौकशी करीत असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

मात्र अद्याप कोणत्याही संचालकावर कारवाई न झाल्याने यांची न्यायालयीन चौकशीच व्हावी अशी आग्रही मागणी विरोधकांनी केली. भ्रष्टाचारी नेत्याला पाठिशी घालणार्‍या सरकारचा धिक्कार असो, न्याय द्या, न्याय द्या सभापती न्याय द्या अशा जोरदार घोषणा देत विरोधी पक्षाचे सदस्य वेलमध्ये उतरले. घोषणा देण्यामध्ये राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण आघाडीवर होत्या. या घोषणाबाजीमुळे सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. त्यामुळे सभागृहाचे कामकाच सभापतीनी दहा मिनिटांसाठी तहकूब केले. तर या प्रकरणात लोकायुक्तानी दिलेले आदेश काय आहेत हे मी तपासून घेईन आणि त्यानंतर यावर निर्णय देईन असे सांगून सभापती रामराजे निंबाळकर यांनी यावर तोडगा काढला.