Tue, Apr 23, 2019 20:07होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभा, विधानसभा एकाचवेळी; केंद्राच्या हालचाली

लोकसभा, विधानसभा एकाचवेळी; केंद्राच्या हालचाली

Published On: Apr 15 2018 1:28AM | Last Updated: Apr 15 2018 8:28AMनवी दिल्ली : पीटीआय

2019 साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकाचवेळी घेण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. कायदा आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकार याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मत मागविणार आहे. 2019 आणि 2024 अशा दोन टप्प्यात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याचा केंद्राचा विचार आहे.

एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेचा कायदा आयोगाने अभ्यास केला आहे. या आयोगाच्या वतीने विधी मंत्रालयाला पुढील आठवड्यात एकाचवेळी निवडणूक घेण्याबाबत शिफारस करण्यात येणार आहे. सरकारचा थिंक टँक मानल्या जाणार्‍या नीती आयोगानेही एकाचवेळी निवडणूक घेण्याबाबत केंद्र सरकारला शिफारस केली आहे. 2019 आणि 2024 अशा दोन टप्प्यात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक घेण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका 2019 साली लोकसभेसोबत घेण्याचा विचार आहे. तर दुसर्‍या टप्प्यात 2024 साली उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि पंजाब या राज्यांच्या निवडणुका लोकसभेबरोबर घेण्याचे विचाराधीन आहे. कायदा आयोगाच्या शिफारशीनंतर केंद्र सरकार निवडणूक आयोगाकडे मत मागविणार आहे. निवडणूक आयोगाच्या मतानंतर कायदेशीर बाबींची पूतर्ता करण्याच्या दिशेने केंद्र सरकार हालचाली करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुख्य निवडणूक आयोग ओमप्रकाश रावत यांनी एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या सरकारच्या हालचालीबाबत सावध भूमिका घेतली आहे. ही प्रक्रिया कायदेशीर आणि वेळखाऊ आहे. घटनादुरुस्तीसारख्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

काय करावे लागेल...
एकाचवेळी निवडणुका घ्यायच्या झाल्यास संबंधित विधानसभेचा कार्यकाळ कमी अथवा वाढवावा लागेल. अविश्‍वास प्रस्ताव आणि पाठोपाठ विश्‍वासदर्शक ठरावही घ्यावे लागेल. याशिवाय घटनादुरुस्ती आणि लोकप्रतिनिधी कायद्यात दुरुस्ती कराव्या लागतील.

वाचा : मोदी सरकारचा मास्टर प्लॅन: एकत्र निवडणुकीसाठी राष्ट्रपती राजवट 

पहिला टप्पा : (2019)

महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, आसाम, बिहार आणि मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका 2019 साली लोकसभेसोबत घेण्याचा विचार आहे.

दुसरा टप्पा : (2024)

दुसर्‍या टप्प्यात 2024 साली उत्तर प्रदेश, गुजरात, कर्नाटक, दिल्ली आणि पंजाब या राज्यांच्या लोकसभेसोबत निवडणुका घेण्याचे विचाराधीन आहे.