Wed, Nov 14, 2018 03:45होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी

लोकसभा, विधानसभेत काँग्रेस आघाडी

Published On: May 06 2018 2:08AM | Last Updated: May 06 2018 2:01AMगोंदिया : वृत्तसंस्था

काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रपणे लढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्‍ल पटेल यांनी गोंदियात झालेल्या पत्रकार परिषदेत केली.
दिल्‍लीत अलीकडेच राहुल गांधी आणि शरद पवार यांची भेट झाली. त्यावेळी केवळ हीच निवडणूक नव्हे, तर आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतही काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र लढावे, अशी चर्चा दोन्ही नेत्यांमध्ये झाली. आघाडीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली असून, लवकरच यावर शिक्‍कामोर्तब होईल, असेही पटेल यांनी नमूद केले. 

सध्या भंडारा-गोंदिया आणि पालघर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र लढणार आहे, असे ते म्हणाले. यापूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीने नुकतीच विधान परिषद निवडणुकांसाठी आघाडी केली होती. दोन्ही पक्षांनी 50-50 चा फॉर्म्युला मान्य केला होता. त्यानुसार अमरावती, परभणी-हिंगोली व चंद्रपूर या जागांवर काँग्रेस लढेल. तर लातूर,  कोकण आणि नाशिकची जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला आली आहे.

भंडारा - गोंदियात राष्ट्रवादीचाच उमेदवार!

भाजपचे खासदार नाना पटोले यांनी राजीनामा दिल्यामुळे 28 मे रोजी होणार्‍या भंडारा - गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीतील जागेवरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुरु असलेला वाद अखेर शनिवारी संपुष्टात आला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासोबत झालेल्या चर्चेत ही जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती माजी खासदार पटोले यांनी दिली. 

भाजपला रामराम ठोकून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पोटनिवडणुकीतही पटोले हेच काँग्रेसचे उमेदवार असतील, अशी चर्चा होती. स्वतः पटोले यांनी तशा प्रकारचा दावा केला होता. तर भंडारा - गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार असेल. 9 मे रोजी पक्षाचा उमेदवार घोषित करु, असे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी जाहीर केले होतेे. पक्षाचे प्रमुख प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ही माहिती दिली असताना पटोले आपल्या दाव्यावर कायम राहिले. त्यामुळे या निवडणुकीसाठी आघाडी बिघडेल, अशी चर्चा होती.

ही चर्चा थांबविण्यासाठी पटेल आणि आपल्यात काहीही मतभेद नसल्याचे पटोले यांनी सांगितले, तर नानांशी कोणतेही मतभेद नाहीत. ते माझे लहान भाऊ आहेत. येणार्‍या काळात सोबत काम करु, असे प्रफुल्ल पटेल म्हणाले असताना पटोले यांनी ही जागा काँग्रेस लढविल, असे जाहीर केले. अखेरीस शनिवारी दिल्लीत आलेल्या पटोले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबतच्या बैठकीत भंडारा-गोंदियाची जागा राष्ट्रवादीला देण्याचा निर्णय झाल्याची माहिती दिल्याने तणाव निवळला.