Mon, Jun 01, 2020 22:19
    ब्रेकिंग    होमपेज › Mumbai-Thane-Raigad › राज्यात हायव्होल्टेज लढतींसाठी उद्या मतदान : उमेदवारांची 'अग्नीपरीक्षा'

राज्यात हायव्होल्टेज लढतींसाठी उद्या मतदान : उमेदवारांची 'अग्नीपरीक्षा'

Published On: Apr 22 2019 8:00PM | Last Updated: Apr 22 2019 8:53PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या दोन टप्प्यात चुरशीने मतदान झाले, असले तरी हायव्होल्टेज लढतींसाठी उद्या देशभरात मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये ११५ लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. यामध्ये १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. 

आसाम, बिहार, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मीर कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांमधील काही जागांवर मतदान होईल. दरम्यान,  गुजरात, केरळ,  दादरा आणि नगर हवेली,  गोवा,  दमन आणि दीव या ठिकाणी सर्व लोकसभा जागांवर उद्या एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 

राज्यात हायव्होल्टेज लढतींसाठी मतदान

राज्यातील  पहिल्या दोन टप्प्यात विदर्भ आणि मराठवाड्यात मतदान पार पडले होते. तिसऱ्या टप्प्यात अत्यंत चुरशीने प्रचार झालेल्या पश्चिम महाराष्ट्रासह कोकणामध्ये मतदान होणार आहे. जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, नगर, माडा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदूर्ग, कोल्हापूर, आणि हातकणंगले या मतदारसंघात मतदान होणार आहे. 

सातारा लोकसभा मतदारसंघात 18 लाख 38 हजार 987 मतदार असून त्यामध्ये पुरुष मतदार 9 लाख 35 हजार 878  तर स्त्री मतदार 9 लाख 3 हजार 92 आहेत. सर्व्हिस व्होटर 9 हजार 503 असून कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक 3 हजार 389 इतकी संख्या आहे.  या निवडणुकीत 9 हजार 830 दिव्यांग मतदार असून त्यांना या निवडणुकीत मतदान केंद्रांवर 16 सुविधा पुरवण्यात येणार आहेत. व्हीलचेअर, स्वयंसेवकाची व्यवस्था करण्यात  येणार आहे. त्यांनी पीडब्ल्यूडी अ‍ॅपद्वारे  मदत मागितल्यास त्यांना सरकारी वाहन पुरवले जाईल. तीन-चार केंद्रांमध्ये मिळून अशी व्यवस्था आहे.  

गेल्या महिनाभरापासून कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघातील निवडणुकीच्या हायव्होल्टेज प्रचाराची रविवारी सायंकाळी सांगता झाली. दोन्ही मतदार संघात मंगळवारी दि. 23 रोजी अटीतटीने, ईर्ष्येने मतदान होणार आहे. कोल्हापुरात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार खा. धनंजय महाडिक आणि भाजप-शिवसेेना महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी, तर हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खा. राजू शेट्टी व भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भव्य रॅली काढून शक्‍तिप्रदर्शन केले. गेल्या महिनाभरात कोल्हापुरात दिग्गज नेत्यांच्या सभांनी वातावरण ढवळून गेले आणि आरोप-प्रत्यारोपांनी प्रचाराची कमाल पातळी गाठली.

सांगली लोकसभेसाठी 18 लाख 3 हजार 54 मतदार आहेत. त्यात पुरुष मतदार 9 लाख 29 हजार 232 तर स्त्री मतदार 8 लाख 73 हजार 749 आणि तृतीयपंथी 73 आहेत. एक हजार 39 इमारतीत 1 हजार 848 मतदान केंद्रे आहेत. 25 संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. टपाली मतदान 18 हजार 382 असून, त्यात सैनिक मतदार 6 हजार 55 आणि कर्मचारी, अधिकारी यांचे 12 हजार 327 मतदार आहेत.