Wed, May 22, 2019 15:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉजिंग-बोर्डिंगच्या नावाखाली चालतो कुंटणखाना

लॉजिंग-बोर्डिंगच्या नावाखाली चालतो कुंटणखाना

Published On: Mar 03 2018 1:47AM | Last Updated: Mar 03 2018 9:24AMडोंबिवली : वार्ताहर

अल्पवयीन तरुणींना शरीरविक्रीसाठी डांबून ठेवलेल्या कल्याण-मलंगरोडच्या नांदीवली गावातील हॉटेल रिलॅक्स गार्डन नेक्स लॉजिंग अ‍ॅन्ड बोर्डिंग या लॉजमधील कथित कुुंटणखान्याला ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी चांगलाच दणका दिला आहे. अनैतिक मानवी वाहतूक तथा व्यापार प्रतिबंधक विभागाने या कुंटणखान्यावर सीलबंदीची कारवाई केली आहे. क्राईम ब्रँचच्या या कारवाईमुळे अनैतिक देहव्यापार्‍यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या पथकाने 15 ऑगस्ट 2017 रोजी कल्याणच्या मलंगरोडवरील याच लॉज वजा कुंटणखान्यातून एका अल्पवयीन तरुणीसह चौघींची सुटका केली होती. 

वाचा : उत्तमनगर येथे फ्लॅटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्रीस लावणार्‍या सत्यनारायण पाल, हरिश्चंद्र शेट्टी, विज्ञान सामल, विजय शेट्टी, श्रीकांत मोहणी, राहुल दत्त या 6 जणांना त्यावेळी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. लोकवस्ती असलेल्या सार्वजनिक ठिकाणापासून अवघ्या 200 मीटरवर हा कुंटणखाना चोरी-छुपे चालवण्यात येत होता. त्यामुळे अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम सन 1956 च्या कलम 18 अन्वये तो सीलबंद करण्याचा प्रस्ताव ठाण्याच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कक्षाने 26 फेब्रुवारी 2018 रोजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्याकडे पाठविला होता. याच प्रस्तावाची 27 फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी झाल्यानंतर संबंधित लॉज सीलबंद करण्याचे आदेश आयुक्त परमबीर सिंग यांनी दिले होते. या आदेशानुसार दोन पंचासमक्ष वपोनि रवींद्र दौंडकर यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश वाळके व त्यांच्या पथकाने मंगळवारी तो एक महिन्यासाठी सिलबंद केला आहे.

आणखी कुंटणखाने करणार सील

अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 च्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रासाठी कार्यकारी दंडाधिकारी व अतिरिक्त दंडाधिकारी म्हणून पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 मधील कलम 18 व 20 च्या प्रयोजनासाठी अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांचे अधिकारही त्यांना प्रदान करण्यात आले आहेत. याचा वापर करून पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी हा कुंटणखाना सीलबंद केला आहे. अशाच प्रकारे कोणत्याही लॉज अगर इतर ठिकाणी अल्पवयीन वा सज्ञान मुलींचा वापर वैशाव्यवसायासाठी करवून  घेतला जात असल्याचे आढळून आल्यास तेही सीलबंद करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.