Thu, Jul 02, 2020 23:26होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाकिस्तानातून आलेली टोळधाड पोहोचली महाराष्ट्रात; रानात डीजे लावायची आली वेळ!

पाकिस्तानातून आलेली टोळधाड पोहोचली महाराष्ट्रात; रानात डीजे लावायची आली वेळ!

Last Updated: May 28 2020 3:21PM

संग्रहित छायाचित्रनवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

पाकिस्तानातून आलेली टोळधाड आता महाराष्ट्रासह नऊ राज्यांपर्यंत पोहोचली आहे. टोळधाडीच्या पिकांवरील आक्रमणामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत आलेला आहे. टोळधाडीचा मुकाबला करण्यासाठी विविध राज्य सरकारांनी आपापल्या स्तरावर प्रयत्न सुरू केले आहेत. 

ज्या राज्यांपर्यंत टोळधाड येऊन धडकली आहे, त्या राज्यात महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तामिळनाडू आणि प. बंगाल यांचा समावेश आहे. टोळधाडीचा हल्ला परतवून लावण्यासाठी शेतकरी आणि स्थानिक प्रशासन विविध उपाय योजत आहेत. मान्सूनचा पाऊस सुरु होण्यापूर्वी टोळधाडीचे आक्रमण परतवून लावण्याचा राज्य सरकारांचा प्रयत्न आहे. आगामी महिन्यात टोळधाडीमुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा केंद्र सरकारच्या अखत्यारितील एलडब्ल्यूओ संस्थेने दिला आहे.

मान्सूनच्या आधी टोळधाडीला संपविण्यात आले नाही तर खरीप पिकांचे नुकसान होऊ शकते, असेही एलडब्ल्यूओने आपल्या अहवालात नमूद केले आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात या राज्यात 303 ठिकाणी 47 हजार 308 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान टोळधाडीने केलेले आहे. टोळधाडीची झुंड बुधवारी उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये पोहोचली. एक वर्ग किलोमीटर परिसरात टोळधाड मोठ्या प्रमाणावर आहे. टोळधाडीला मारण्यासाठी कीटनाशकांची फवारणी केली जात आहे. याशिवाय डीजे आणि मोठ्या आवाजाचे स्पीकर लावून कीटकांना पळविण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

उत्तर प्रदेशातील ललितपुर, मथुरा आणि कानपुर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. राजस्थानमध्ये परिस्थिती जास्त खराब आहे. जयपूरमध्ये कृषी विभागाने ठिकठिकाणी कीटनाशकांची फवारणी केली आहे. फवारणीसाठी ड्रोनची मदत घेतली जात आहे. अग्निशमन दलाच्या गाड्यांद्वारे देखील कीटकनाशके फवारली जाणार आहेत. टोळधाड नियंत्रणासाठी 120 सर्वेक्षण वाहन व 810 ट्रॅक्टर्सची मदत घेतली जात आहे. 

छत्तीसगडमध्ये लाखोंच्या संख्येने कीटक येऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे. शेतकऱ्यांना टोळधाड नियंत्रणाच्या अनुषंगाने मार्गदर्शन केले जात आहे. टोळधाडीने महाराष्ट्रातील नागपूर विभागातही प्रवेश केला आहे. टोळधाड रामटेक शहराकडे जाण्याचा अंदाज आहे. फेत्री, खानगाव येथील शेतांचे नुकसान केल्यानंतर टोळधाडीने वर्धा जिल्ह्यातील संत्री पिकांबरोबरच भाजीपाल्याचे नुकसान केले होते.