Tue, Jul 07, 2020 05:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लॉकडाऊन एकदम उठवण्याची चूक करणार नाही : मुख्यमंत्री 

लॉकडाऊन एकदम उठवण्याची चूक करणार नाही : मुख्यमंत्री 

Last Updated: May 30 2020 1:57AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

एकदम लॉकडाऊन करणे हे चुकीचे होते. मात्र आता एकदम लॉकडाऊन उठवण्याची चूक केली जाणार नाही. लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने उठवण्याचे प्रत्येक पाऊल जपून टाकले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी निवडक संपादकांशी बोलताना स्पष्ट केले. 

चौथा लॉकडाऊन 31 मे रोजी संपत असून, तो पुढे सुरू ठेवायचा की लॉकडाऊन-5 जाहीर करायचा यावर केंद्र आणि राज्य पातळीवर मोठे मंथन सुरू आहे. राज्यांकडून केंद्राने सूचनाही मागवल्या आहेत. महाराष्ट्राने काय सूचना केल्या हे अद्याप स्पष्ट नाही. या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या हिरवळीवर संपादकांशी संवाद साधला. यावेळी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुुंबई महापालिकेचे आयुक्‍त इक्बाल सिंह चहल उपस्थित होते. 

लॉकडाऊनचा निर्णय केंद्र घेणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सूचित केले. केंद्राच्या काय मार्गदर्शक सूचना येतात त्यावर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट करून ते म्हणाले, मुंबईसह महाराष्ट्रातील कोरोना साथीची स्थिती आज नियंत्रणात आहे. याचे कारण गेले दोन महिने घेतलेली मेहनत. त्यामुळे हा लॉकडाऊन एकदम उठवला तर ही संपूर्ण मेहनत वाया जाईल आणि परस्थिती हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. केंद्राच्या सूचना आल्यानंतर लॉकडाऊनबद्दल अत्यंत काळजीपूर्वक निर्णय घेतला जाईल. प्रत्येक पाऊल हे केळीच्या सालीवर टाकायचे आहे. घसरून पडायचे नाही आणि पुढचे पाऊलदेखील टाकायचे आहे. प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागेल. 

लॉकडाऊन 31 मे नंतरही काही प्रमाणात कायम राहण्याचे संकेत देताना उद्धव म्हणाले, महाराष्ट्रातून आणि इतरही राज्यांतून लाखो स्थलांतरित मजूर आपापल्या राज्यांत गेले आहेत. बाहेरूनही अनेक लोक राज्यात आले आहेत. या सार्‍यांच्या स्थलांतराचा परिणाम कोरोनाच्या संसर्गावर होऊ शकतो. साधारणत: पंधरा दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल. आता केरळातही कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोलत आहेत, आढावा घेत आहेत, असे उद्धव यांनी स्पष्ट केले. 

मुंबईसह महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या ही आजही पहिल्या दिवसापासूनच्या पहिल्या रुग्णासह मोजली जाते. त्यातून मुंबईबद्दल, महाराष्ट्राबद्दल देशात आणि विदेशातही गैरसमज निर्माण झाले. महापालिका आयुक्‍त इक्बाल सिंह चहल यांच्या या युक्‍तिवादाला दुजोरा देत मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई आणि महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला हवा. महाराष्ट्रातील कोरोना स्थिती नियंत्रणात आहे,  ही वस्तुस्थिती आहे. मात्र ती लोकांसमोर आली आणि आपण सारे काही   सुरू करून टाकले तर परिस्थिती हाताबाहेर जाईल. 

मुंबईकरांना आवाहन

मुंबईतून हजारो लोक राज्यभरातील अन्य शहरांमध्ये ई-पास काढून गेले आणि त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग त्या-त्या शहरांमध्ये वाढला. मुंबई संपूर्ण सील का करत नाही, या प्रश्‍नावर मुख्यमंत्री उद्धव यांनी मुंबईकरांना फक्‍त हात जोडून आवाहन केले. मुंबईबाहेर जाण्याच्या वाटा बंद करण्याचा निर्णय न घेता उद्धव म्हणाले, लाखो परप्रांतीयांना रेल्वेने आणि बस गाड्यांनी नेऊन सोडल्याने मुंबईकरही आपापल्या गावी जाऊ देण्याची मागणी करू लागले. त्यातून ई-पास दिले गेले. मात्र माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे. अत्यंत आवश्यक असेल तरच मुंबईबाहेर जा. 

युती ही डेंजरस!

आता पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक आजारांच्या साथी सुरू होतील. कोरोनाची सुद्धा अनेक लक्षणे आहेत. थकवा येणे, तोंडाची चव जाणे, पोट दुखणे. यातील काही लक्षणे पावसाळी आजारांची असतात. त्यामुळे पावसाळी साथींना कोरोनाची साथ मिळू नये याची काळजी घ्यावी लागेल. डेंग्यू आणि कोरोनाची युती झाली तर कठीण होईल. आजकाल युती कुणाची कुणाशीही होऊ शकते, असे मुख्यमंत्री उद्धव यांनी म्हणताच कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. संजय ओक म्हणाले, युती ही डेंजरसच!