Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › स्थानिक पातळीवर तक्रारी सोडवा

स्थानिक पातळीवर तक्रारी सोडवा

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:45AMमुंबई : प्रतिनिधी

तालुका व जिल्हा पातळीवर सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळत नसल्याने न्यायासाठी थेट मंत्रालयात येणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या ठिकाणी येऊन देखील न्याय मिळत नसल्याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल नागरिक उचलू लागल्याच्या प्रकरणांची गंभीर दखल घेत झीरो पेंडन्सी कार्यपद्धती वापर करून स्थानिक पातळीवर सामान्यांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करा, असे आदेश सरकारने दिले आहेत. 

राज्य शासनाच्या विविध विभागांकडे मंडल, तालुका, जिल्हा तसेच राज्य पातळीवर सामान्य नागरिक तसेच प्रशासकीय पातळीवरील कामासंदर्भात येणारी प्रकरणे जलदगतीने रोजच्या रोज हाताळण्यात यावीत. दर दिवशी प्राप्त होणारी प्रकरणे तात्काळ हातावेगळी करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ज्याप्रमाणे झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात येत आहे. त्याप्रमाणे राज्यातील सर्वच शासकीय कार्यालयांत या कार्यपद्धतीचा अवलंब करण्यात यावा अशा सूचना सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. 

झीरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोजल कार्यपद्धतीचा अवलंब करून प्रकरणे निकाली काढताना गुणवत्तेची तडजोड करण्यात येऊ नये. प्रत्येक प्रकरण हे नियम, अधिनियम, शासन निर्णय आणि परिपत्रकांतील तरतुदीनुसार निकाली काढण्यात यावे. संबंधित वरिष्ठ अधिकार्‍यांनी यासंदर्भात योग्य ती खातरजमा करून प्रत्येक प्रकरणाचा ऑनलाईन अहवाल सादर करावा. गोपनीय अहवलात झीरो पेंडन्सी मध्ये केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.