Wed, Feb 26, 2020 03:50होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यात लोकल ठप्प, रस्ते रोखले

ठाण्यात लोकल ठप्प, रस्ते रोखले

Published On: Jan 04 2018 1:49AM | Last Updated: Jan 04 2018 1:32AM

बुकमार्क करा
ठाणे : पुढारी टीम 

बुधवारी सकाळी लांब पल्ल्याच्या एसटी बस सुटल्या, मात्र नंतर खारीगांवमध्ये आंदोलनकर्त्यांची वाहनांची तोडफोड केल्याचे वृत्त आले आणि ठाणे परिवहन विभागाने सर्वच बससेवा थांबवण्याचा निर्णय घेतला. यामुळे बुधवारी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदचा ठाणे परिवहन विभागास 50 लाखांचा फटका बसला. दुसरीकडे लोकलच्या 80 फेर्‍या धावल्याच नाहीत. बहुतांश लोकलसेवा ठप्प झाली होती. आंदोलकांनी कळव्या नाक्यावर चार तास रास्तारोको केला. दुपारनंतर घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड नाक्यावर आंदोलनकर्त्यांनी तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलन मागे घेण्याची घोषणा होऊनही घोडबंदर रोडवरील रस्ता रोको कायम ठेवण्यासाठी आक्रमक बनलेल्या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज केल्यानंतर रस्ता मोकळा झाला. 

भीमा-कोरेगाव येथील घटनेचा निषेध करण्यासाठी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आणि ठाण्यातील सर्व आरपीआय गटाचे नेते एकत्रित येऊन ठाणे बंद यशस्वी केला. दिवसभर चौकाचौकात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्टमुळे अनेक चाकरमान्यांनी घरी राहणे पसंत केले. स्कूल बसचालकांनी बस न चालवण्याचा निरोप सर्व शाळांना पाठवला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे अनेक शाळा व्यवस्थापनाने शाळेला सुटी घोषित केली. काही शाळा, महाविद्यालये सुरू होती. त्यामुळे पालकांना स्वतः पाल्याला घेऊन शाळेत जावे लागले.  ठाणे स्टेशन परिसरातील दुकाने सकाळपासून बंद ठेवण्यात आली. हातात झेंडे घेऊन रस्त्यावर घोषणाबाजी करीत फिरणार्‍या आंदोलनकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे अनेक दुकानदारांनी शटर डाऊन केली. 

तीनहात नाका, गोल्डनडाईज नाका, घोडबंदर रोड, पूर्व द्रुतगती महामार्ग यांसह शहरातील रस्त्यांवर तुरळक वाहने धावत होती. टीएमटी, एसटी, रिक्षा आणि टॅक्सी आदींसह खासगी वाहनेही नेहमीपेक्षा कमीच होती. अशातच तोडफोडीच्या घटनांनंतर परिवहन व्यवस्थापनाने संपूर्ण बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतल्याने सकाळीच चाकरमान्यांचे प्रचंड हाल झाले. यामुळे अनेकजण नाईलाजास्तव घरी परतले. यासाठी त्यांना दामदुप्पट खर्चही करावा लागला.  

आंदोलनादरम्यान सिडको बस स्थानकात तीन टीएमटीच्या बसेसच्या काचा फोेडण्यात आल्या. नौपाडा परिसरात रिक्षाची काच फोडली तर लोकमान्य नगर परिसरात आंदोलनकर्त्यांनकडून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. हा सर्व प्रकार पोलिसांच्या समक्ष होत होता. घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड नाक्यावर शेकडो आंदोलनकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले.