होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग!

विधान परिषदेसाठी काँग्रेसमध्ये लॉबिंग!

Published On: Jun 25 2018 1:49AM | Last Updated: Jun 25 2018 1:38AMमुंबई : चंदन शिरवाळे

विधान परिषदेच्या 16 जुलै रोजी होणार्‍या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये उमेदवार निश्‍चितीसाठी जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांना पुन्हा संधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलीप माने, तर पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्या मर्जीतील एका माजी मंत्र्याच्या नावाचा आग्रह धरला असल्याचे समजते. 

केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख शुक्रवार, 22 जून रोजी जाहीर केली असली तरी उमेदवार निश्‍चितीसाठी काँग्रेसमध्ये महिनाभरापासून लॉबिंग सुरू आहे. विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेसाठी 11 सदस्य निवडले जाणार असल्यामुळे संख्याबळानुसार काँग्रेसचे दोन, तर राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी होणार आहे. त्यामुळे विधान परिषदेत जानते सदस्य असावेत, यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष चव्हाण व विखे-पाटील यांनी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांच्या नावासाठी दिल्लीत फिल्डींग महिनाभरापुर्वीच लावली आहे. या दोघांपैकी श्रेष्ठींनी एका नावाचा पत्ता कट केल्यास पर्याय म्हणुन पक्षाचे प्रवक्ते सचिन सावंत यांचेही नाव पुढे केल्याचे समजते.

माजी मुख्यमंत्र्यांनीही आपल्या समर्थकांसाठी कंबर कसली आहे. सुशीलकुमारांनी सोलापुरमधील आपले कट्टर समर्थक दिलीप माने तर पृथ्वीराजबाबांनी एका माजी मंत्र्याच्या नावासाठी आग्रह धरला आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम हे माजी आमदार चरणसिंग सप्रा यांचे नाव रेटत असल्याचे समजते. महाराष्ट्रातुन ही नावे पुढे पाठविली असली तरी दिल्लीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद व अविनाश पांडे यांनी माजी खासदार मुझफ्फर हुसैन यांच्यासाठी प्रयत्न करत आहेत.

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीसाठी परभणीची जागा काँग्रेसचे बाबाजानी दुर्राणी यांच्यासाठी सोडली होती. त्या बदल्यात राष्ट्रवादीने बीडची जागा लढविली होती. त्यामुळे परभणीत पक्षविस्तारासाठी राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांनी माजी राज्यमंत्री प्रा. फौजिया खान यांच्यासाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. वाघ व मलिक यांना डावलुन प्रा. खान यांना उमेदवारी दिली, अशी चर्चा होऊ नये, यासाठी प्रा. खान यांना पक्षाने गेल्या दोन महिन्यांपासुन अ‍ॅक्टीव्ह केले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली संविधान बचाव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.दिल्लीपाठोपाठ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात होणार्‍या या कार्यक्रमाला पक्षाकडुन फंडींग केले जात असल्याची चर्चा आहे.