Fri, Apr 19, 2019 11:56होमपेज › Mumbai-Thane-Raigad › उल्हासनगरच्या जीन्स कारखान्यांना जीवदान

उल्हासनगरच्या जीन्स कारखान्यांना जीवदान

Published On: Jan 08 2018 1:27AM | Last Updated: Jan 08 2018 12:41AM

बुकमार्क करा
उल्हासनगर : वार्ताहर

मागील दोन महिन्यांपासून बंद पडलेल्या उल्हासनगर शहरातील तब्बल 500 जीन्स वॉश कारखान्यासाठी आनंदाची बातमी आहे. पुण्याच्या एसजीएम या खासगी कंपनीने बनवलेल्या कमी खर्चाच्या छोटेखानी रसायन प्रक्रिया केंद्राला (इटीपी) पालिका प्रशासनाने ना हरकत दाखला दिला आहे. कॅम्प 5 येथील सोनू वॉश आणि बेस्ट रेयॉन या दोन कारखानदारांनी हे इटीपी केंद्र उभारले आहेत. आता प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दाखल्यानंतर हे दोन कारखाने सुरू होऊन उल्हासनगरचा जीन्स बाजार पुन्हा गजबजण्याची शक्यता आहे. 

जीन्सवॉश कारखान्यांमुळे वालधुनी नदी प्रदूषित होत असल्याचा ठपका ठेवून या कारखान्यांची वीज व पाणी जोडणी खंडीत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबरमध्ये दिले होते. पालिका, विद्युत मंडळ, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तब्बल 500 जीन्स वॉश कारखान्यांना सील ठोकले होते. त्यानंतर 100 पेक्षा अधिक कारखाने शहर सोडून गेले होते. या कारखान्यांमध्ये काम करणार्‍या सुमारे 80 हजारपेक्षा अधिक कामगारांनी शहर सोडून गाव गाठले. 

जीन्सवॉश कारखाने पुन्हा कधीच सुरू होणार नाहीत, म्हणून कॅम्प नंबर 5 च्या गायकवाड पाडा, दुर्गा पाडा, आकाश कॉलनी परिसरातील वॉश कारखान्यांचे मालक व कामगारांनी आशा सोडली होती. मात्र टीम ओमी कलानीची फोरम ऑफ उल्हासनगर मॅन्युफॅक्चर असोसिएशन व उल्हासनगर ट्रेड असोसिएशन या संघटना पुण्याच्या एसजीएम या कंपनीबरोबर मिळून समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत होते. आ. ज्योती कलानी यांनी याप्रश्‍नी विधानसभेत आवाज उठवला होता. तर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासह पालकमंत्री एकनाथ शिंदे, खा. श्रीकांत शिंदे यांनी कारखानदारांची बैठक घेऊन समस्येचे निराकरण करण्याचा शब्द दिला होता. 

तब्बल महिनाभराच्या प्रयत्नांनंतर कॅम्प 5 येथील सोनू वॉश आणि बेस्ट रेयॉन या दोन कारखानदारांनी उभारलेल्या प्रक्रिया केंद्रांना पालिका आयुक्त निंबाळकर यांच्या आदेशाने कार्यकारी अभियंता कलई सेलवन यांनी शनिवारी ना हरकत दाखला दिला. या दाखल्यात आयुक्तांनी पालिकेच्या तिजोरीचे तसेच शहराच्या पर्यावरणाचे हित साधण्यासाठी जाचक अटी टाकल्या आहेत. शहरातील लाखो कामगारांना रोजगार देणारा जीन्स व्यवसाय वाचवण्यासाठी कलानी कुटुंबीय संपर्कात होते. दोन कारखानदारांना पालिकेने ना हरकत दाखला दिला असून या कारखान्यांनी उभारलेल्या प्रक्रिया केंद्रातून निघणार्‍या पाण्याचा दर्जा प्रदूषण नियंत्रण मंडळाने तपासल्यावर त्याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर ते दोन कारखाने सुरू होतील.

याबाबत ओमी कलानी यांनी सांगितले की, आम्ही सर्वतोपरी कारखानदार व कामगारांच्या हिताचा विचार करून हे प्रकल्प उभारत वालधुनीच्या प्रदूषण मुक्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. पालिकेने दिलेला ना हरकत दाखला आम्ही भाजप प्रवक्त्या श्वेता शालिनी यांना दाखवला. त्यांनी याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून ना हरकत दाखला मिळवून देण्यासाठी भाजप सरकार प्रयत्न करील, असे आश्वासन दिले. यावेळी भाजप नगरसेवक राजेश वधारिया, नरेंद्र कुमारी ठाकूर, पंचम कलानी, कमलेश निकम, पितु राजवानी, सुमित चक्रवर्ती आदी उपस्थित होते.