Thu, Apr 25, 2019 07:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › 'अपोलो'त चिमुरड्याला बसविले मावशीचे लिव्‍हर

'अपोलो'त चिमुरड्याला बसविले मावशीचे लिव्‍हर

Published On: Apr 07 2018 10:52AM | Last Updated: Apr 07 2018 10:21AMनवी मुंबई : प्रतिनिधी

नवी मुंबईतील अपोलो रुग्‍णालयाच्या डॉक्‍टरांनी एका वर्षाच्या चिमुरड्यावर यकृत (लिव्‍हर) प्रत्यारोपनाची यशस्‍वी शस्‍त्रक्रिया केली आहे. राम मिस्‍त्री असे चिमुरड्याचे नाव असून त्याला मावशीचे यकृत बसविले आहे. रामला बायलरी अट्रॅशिया हा दुर्धर आजार झाल्याने त्याचे यकृत निकामी झाले होते. दिल्‍ली आणि चेन्‍नई वगळता अशी अवघड शस्‍त्रक्रिया भारतात इतर ठिकाणी होत नाहीत. मात्र, आता मुंबईही लहान मुलांच्या अवयव प्रत्यारोपनाचे केंद्र बनले आहे. 

रामचा जन्म झाल्यानंतर त्याला काही दिवसांमध्येच बायलरी अट्रॅशिया या विकाराची बाधा झाली. त्यामुळे दिवसेंदिवस त्याची प्रकृती ढासळली. जन्मानंतर काही महिन्यातच त्याचे यकृत निकामी झाले. त्यामुळे यकृत प्रत्यारोपणाशिवाय दुसरा कोणताही पर्याय त्याच्या पालकांसमोर नव्हता. लहान मुलांच्या यकृताचे प्रत्यारोपण फक्त दिल्ली आणि चेन्नई येथेच होते. या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे ३५ लाख रुपये असल्याने तो मिस्त्री कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. त्यांनी उपचारासाठी नवी मुंबई गाठली. अपोलो रुग्णालयाने पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार न करता प्रथम उपचार सुरू केले. 

रामची मावशी दिव्या हिचे यकृत रामला बसविले. या शस्त्रक्रियेसाठी साडेसोळा लाख रुपये खर्च आला. त्यामध्येही सीएसआर योजनेच्या माध्यमातून अपोलो रुग्णालयाने दोन लाख रुपये माफ केले. त्यामुळे शस्त्रक्रिया फक्त साडेचौदा लाख रुपयांमध्ये झाली. रामच्या आई-वडिलांची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने मदतीचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत अनेक स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आणि मिस्त्री कुटुंबावर या शस्त्रक्रियेचा कोणताही आर्थिक भार पडला नाही. ही शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी यकृत प्रत्यारोपण विभागाचे प्रमुख डॉ. डेरिअस मिर्झा, नरेंद्र त्रिवेदी, विजय येवले, आबा नागराल यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. 

यकृत प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी युरोपियन राष्ट्रांमध्ये सुमारे ६५ लाख रुपये खर्च येतो. हिच शस्त्रक्रिया दिल्ली आणि चेन्नई येथे करायची असेल तर सुमारे ३५ लाख रुपये मोजावे लागतात. अपोलो रुग्णालयात ही शस्त्रक्रिया साडेसोळा लाख रुपयांमध्ये होत आहे. अवयव प्रत्यारोपणाचा परवाना मिळाल्यानंतर आम्ही आतापर्यंत २१ रुग्णांवर लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया केल्या असून त्यामध्ये ६ लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांपैकी चार मुले गरीब घरातील होती. त्यांच्यासाठी सामाजिक संस्थांच्या मदतीने रुग्णालयाने निधीही उपलब्ध केला आहे. गोरगरीबांना अवयव प्रत्यारोपण करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, असे आवाहन डॉ. मिर्झा यांनी केले आहे. 

अपोलो रुग्णालय हे नवी मुंबईमध्ये आहे. त्यामुळे मुंबईमधील सिद्धिविनायक, लालबागचा राजा यांच्यासह अन्य ट्रस्टची मदत अपोलो रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांना मिळत नाही. राज्यामध्ये लहान मुलांच्या प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया फक्त अपोलो रुग्णालयात होतात. त्यामुळे मुंबईतील ट्रस्ट आणि राज्य सरकारच्या आरोग्य विभागानेही लहान मुलांच्या शस्त्रक्रियेसाठी मदत करणे गरजेचे आहे, असे मत यावेळी बालरोगतज्ज्ञ विजय येवले यांनी व्यक्त केले. 

Tags : ram mestri, mumbai, mumbai news, liver transplant surgery, apollo hospital,