होमपेज › Mumbai-Thane-Raigad › रजनीकांतप्रमाणे राजकारणात येणार नाही : नाना पाटेकर

रजनीकांतप्रमाणे राजकारणात येणार नाही : नाना पाटेकर

Published On: Jan 20 2018 7:38PM | Last Updated: Jan 20 2018 7:38PMमुंबई : प्रतिनिधी

नाना पाटेकर म्हणजे महाराष्ट्राचा खर्‍या अर्थाने आपला माणूस. राज्याच्या कानाकोपर्‍यातल्या दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना तो ‘नाम’मुळे आपला वाटतो. तर चंदेरी पडद्यावर काहीतरी करण्यासाठी धडपडणार्‍या नवोदित कलाकारांसाठी नानाचा आधार असतो. नाना बोलतो, नाना कानपिचक्या देतो, नाना वाद अंगावर ओढवून घेतो. पण प्रत्येक विषयावर नानाची ठरलेली मतं असतात. चित्रपटातील आपल्या भूमिकेपासून ‘पद्मावत’पर्यंत आणि ‘नाम’ फाऊंडेशनच्या देणगीदारांपासून ते रजनीकांतच्या राजकारणप्रवेशापर्यंत प्रत्येक विषयावर नाना भरभरुन बोलतो. बोलतो म्हणण्यापेक्षा धबधब्यासारखा कोसळतो, हा शब्द अधिक योग्य. सेन्सॉरबाह्य सेन्सॉरला नाना कडाडून विरोध करतो, समाजातल्या अस्थिरतेबद्दल राजकारण्यांना जबाबदार धरतो आणि मी राजकारणात येणार नाही, असंही सांगतो. त्याची मुख्य भूमिका असलेला ‘आपला मानूस’ हा बडा मराठी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याच्या ट्रेलर लाँचप्रसंगी त्याच्याशी केलेही ही बातचीत.

खूप दिवसांनी नाना आपला मानूसच्या माध्यमातून पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा पोलीस यशवंत लोहार आहे, शिवाजीराव वागळे आहे की साधू आगाशे आहे ?

‘आपला मानूस’मध्ये मी रंगवलेला पोलीस खूप वेगळा आहे. तो ग्रामीण भागातून आला आहे. चित्रपटाच्या सुरुवातीच्या भागात तो आपल्याला शत्रू वाटतो. आधी त्याची भीती वाटते. त्याचा राग येतो. नंतर हळुहळू तो मित्र होवू लागतो. आपला वाटू लागतो. शेवटच्या अर्ध्या तासात चित्रपट एकदम बदलतो. हा चित्रपट सस्पेन्स थ्रिलर या एकाच जॉनरचा नाही. यात वेगवेगळे कंगोरे रसिकांना बघता येतील. 

तुमच्या लेखी तुमचा ‘आपला माणूस’ कोण आहे ? 

सगळा समाजच माझा आपला माणूस आहे. म्हणून समाजात काही विपरीत घडलं की मी चिडतो, बोलतो, व्यक्त होतो. ज्यांची राजकीय दुकानं बंद झाली आहेत अशी काही मूठभर माणसं समाजात फूट पाडतात. आपण सगळ्याच राजकारण्यांबद्दल वाईट बोलू शकत नाही. अशी फूट पाडणारी मंडळी मोजकीच असतात. आपलं स्थान कायम टिकवण्यासाठी ती जाती आणि धर्माच्या भिंती घालतात. आणि वाईट म्हणजे सारेच त्यांच्या वाईट हेतूसाठी वापरुन घेतले जातात. तुम्ही वापरले जाताय हे तरुणांनी लक्षात घ्यायला हवं. 

समाजात वाढलेल्या या दुराव्यावर तुमच्या मते काय उपाय आहे? 

आपली चूक अशी आहे की आपण समस्येचे मूळ शोधत नाही. काल लोकसंख्या 30 होती आज ती 130 झाली आहे. काल नोकर्‍यांची संख्या 1000 होती आज ती 1500 झाली असेल. पण त्या नोकरीच्या प्रमाणात लोकसंख्या खूप वाढली आहे. नोकर्‍याच नसल्यामुळे हिसकावून घेण्याची प्रवृत्तीही वाढली आहे. प्रत्येक बेरोजगाराच्या मनात एक खदखद असते. आणि काही कारण मिळालं की जातीधर्माच्या नावाखाली ती बाहेर येते. बेरोजगारी हे सार्‍या समस्येचे मूळ आहे. पण आपण समस्येच्या मुळाशी जात नाही. आपण वरवरची मलमपट्टी करत राहतो. वास्तविक कोणताही भेदाभेद न करता सर्वांना एकच कायदा करायला हवा. आणि सर्वांना समान हक्क द्यायला हवेत. मला बोलता येतं, म्हणून मी बोलतो. मला काहीतरी होईल, कुणीतरी काहीतरी करेल, ते मला चालेल, पण मी बोलत राहणार आहे. कारण दुसर्‍याच्या चेहर्‍यावरचे मलूल भाव मला पाहवत नाहीत. तुमचं दु:ख विसरायला लावणं, हा कलाकार म्हणून माझा धर्म आहे.  

सेन्सॉरबाह्य सेन्सॉरचे प्रमाण हल्ली खूप वाढले आहे, त्याबद्दल काय सांगाल ?

चित्रपट बनविणार्‍यांना किंवा कोणत्याही कलाकाराला हजार गोष्टी सांगितल्या जातात. वास्तविक एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावर मतमतांतरे होणे चुकीचे आहे. सेन्सॉर बोर्ड ही त्यासाठी निर्माण केलेली यंत्रणा आहे. तिने एकदा एखादी कलाकृती मंजूर केल्यानंतर कोणताही आक्षेप घेतला जाऊ नये. एकदा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर काय चांगले आणि काय वाईट, हे ठरविण्याचा लोकांचा अधिकार आहेच की. अलिकडे माध्यमांवर विविध विषयांवर चर्चा होतात. त्या लाईव्ह असतात. त्यात कुणीही येऊन काहीही बोलून जातो. त्या एखाद्या विधानामुळेही समाजात फूट पडू शकते. समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र त्यावर कोणताही सेन्सॉर नाही. आम्हाला मात्र हजार गोष्टी सांगण्यासाठी लोक तयारच असतात. सेन्सॉर ही यंत्रणा खूप चांगली आहे, ते नसतं तर कोणतीही आक्षेपार्ह कलाकृती माथी मारली गेली असती आणि गहजब उडाला असता.

नाम फाऊंडेशनचं काम कसं सुरु आहे ? 

नाम फाऊंडेशनमुळे माझ्या सुखदु:खाच्या व्याख्या आणि कक्षा बदलल्या. मी आज नटसम्राट केला असता तर तो वेगळ्या प्रकारे केला असता. आणि नामच्या माध्यमातून फिरताना मला कळलेली आणि मी पाहिलेली दु:खं खूप वेगळी आहेत. आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी उत्खनन सुरु आहे. दाते सढळ हाताने मदत करीत आहेत. ज्याच्याकडे एक कोटी रुपये आहेत, त्याने त्यातले 50 हजार रुपये दिले तर मला त्याचे कौतुक वाटत नाही. पण ज्याच्याकडे मुळातच 5 हजार आहेत आणि त्यातले 100 जो देतो, तो आमच्यासाठी खूप महत्त्वाचा. अशी खूप लोकं आम्हाला भेटत आहेत. 

रजनीकांत यांनी तामिळनाडूच्या राजकारणात प्रवेश केला आहे, त्याबद्दल तुमचं मत काय आहे ? तुम्ही राजकारणात येणार का ? 

रजनीकांत हा खूप चांगला माणूस आहे. अलिकडेच मी त्याच्याबरोबर एक सिनेमा केला. राजकारणात जाऊ नको, असा सल्ला मी त्याला दिला होता. तुमचे सहकारी चुका करतील, आणि त्याचे बिल तुमच्यावर फाडले जाईल, असेही मी त्याला सांगितले होते. नुसतं छान आणि चांगलं असणं राजकारणात चालत नाही. त्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी खूप गोष्टी कराव्या लागतात. तशा उलट्यापालट्या कोलांट्या मारणे त्याला जमणार नाही. तो खूप साधाभोळा माणूस आहे. अर्थात राजकारणात जाणं हा सर्वस्वी त्यानं घेतलेला निर्णय आहे, कदाचित तो बरोबर असेल आणि मी चुकत असेन, कदाचित तो खूप चांगलं काहीतरी करुनही दाखवेल. ही ज्याच्या त्याच्या वेळेची गोष्ट आहे. पण मी मात्र राजकारणात येणार नाही.