Thu, Apr 25, 2019 21:28होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद

मुरबाडमधील आजीबाईच्या शाळेची लिम्का बुकात नोंद

Published On: Feb 23 2018 9:30AM | Last Updated: Feb 23 2018 9:28AMमुरबाड / धसई : वार्ताहर

जगभरातून कौतुक होत असलेल्या मुरबाडच्या आजीबाईच्या शाळेने लिम्का बुक पर्यंत मजल मारली आहे. लिम्का बुकात नोंद झाल्याने मुरबाडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

मुरबाड तालुक्यातील दुर्गम भागातील फांगणे गावात जि. प. शिक्षक योगेन्द्र बांगर यांनी दीड वर्षांपूर्वी कै. मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल संचालित आजीबाईची शाळा सुरू केली. या शाळेत गावातील 60 ते 90 वयाच्या सर्व आजीबाईंनी सहभाग नोंदवत शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे सिद्ध केले आहे. शिक्षक बांगर यांच्या उपक्रमाची दाखल घेत त्यांना कॅनडातून निमंत्रण मिळाले होते. त्यामुळे या शाळेचे जगभरातून कौतुक होत आहे. या उपक्रमानंतर बांगर यांनी त्यांच्या स्वतःच्या गावात आजी- आजोबांसाठी शाळा सुरू केली आहे. ही शाळा फक्त रविवारी भरते. या शाळेत 9 विद्यार्थी संसारातील जोडीदार आहेत. नुकताच या शाळेत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यात आला. मुरबाडमधील शाळेची लिम्का बुकमध्ये नोंद करण्यात आल्याची माहिती लिम्का बुकचे संपादक विशाल बनरेज यांनी सन्मान पत्र पाठवून कळवली. लिम्का बुकात नोंद झाल्यामुळे या शाळेच्या शिरपेचात तुरा खोवला गेला आहे. शिवाय एका उपक्रमाचा गौरवही झाला आहे

‘मार्च 2016 मध्ये शिवजयंती निमित्त शिवचरित्र पारायणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. तेव्हा गावातील एक आजीबाई मला म्हणाल्या की, जर आम्हाला लिहिता वाचता येत असते तर आम्ही देखील या कार्यक्रमात भाग घेतला असता. त्या आजीबाईंचे बोलणे आणि त्यांची इच्छा माझ्या मनाला भावली आणि मी ठरवले की आपण गावातील अशिक्षित वयोवृद्धांसाठी एक शाळा सुरू करायची. त्यानुसार 8 मार्च 2016 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मी फांगणे या गावात आजीबाईची शाळा सुरू केली. या शाळेत शीतल मोरे या शिक्षिका म्हणून काम पाहतात.’
- योगेंद्र बांगर