Thu, Jun 27, 2019 15:58होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांना पत्र

माहिती अधिकार कार्यकर्त्यांवर कारवाईसाठी पोलीस आयुक्तांना पत्र

Published On: Mar 09 2018 2:06AM | Last Updated: Mar 09 2018 1:20AMठाणे : प्रतिनिधी

वारंवार माहितीच्या अधिकारात माहिती मागवणार्‍या माहिती अधिकार कार्यकर्त्यांचा अभ्यास करून महापालिकेने गठीत केलेल्या समितीने आपला अहवाल गुरुवारी सादर केला असून यात काहींचा माहिती मागवण्याचा हेतू संशयास्पद असून या कार्यकर्त्यांची भूमिकाच ब्लॅकमेल स्वरूपाची असल्याचा निष्कर्ष या समितीने नोंदवला आहे. समितीने दिलेल्या अहवालात अर्ज करणार्‍यांमध्ये माजी नगरसेवक , पक्षाचे पदाधिकारी व काही प्रसिद्ध माहिती अधिकार्‍यांचा समावेश असून  या सर्वांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेतर्फे पोलीस आयुक्तांना पत्र देण्यात आले आहे . 

विधानसभेतील आरटीआय कार्यकर्त्यांच्या  लक्षवेधीच्या अनुषंगाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ठाणे महापालिकेच्या महासभेतही हा मुद्दा चर्चेचा विषय झाला होता. आ. प्रताप सरनाईक यांनी विधासभेत लक्षवेधी मांडली होती. माहिती अधिकार कार्यकर्त्यांना  कितपत माहिती द्यावी, कोणती माहिती देऊ नये, एक कार्यकर्ता कितीवेळा माहिती मागतो, याचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचे मतही काही नगरसेवकांनी व्यक्त केले होते.

विधानसभेत झालेल्या चर्चेच्या अनुषंगाने आयुक्त संजीव जयस्वाल यांनी महासभेतही यातील काही बाबी सभागृहाच्या निदर्शनास आणल्या होत्या.  त्यानंतर अशा कार्यकत्यांचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेतर्फे सहा जणांची समिती नियुक्त करण्यात आली होती.  समितीतर्फे मागील महिनाभर अशा आरटीआय कार्यकर्त्यांचा अभ्यास सुरु होता. यातून  काही महत्वाची निरीक्षणे समितीने नोंदवली आहेत. एखादा व्यक्ती वारंवार एका विभागात एकाच विषयासाठी प्रश्‍न विचारतात, माहिती घेणारे आणि न्यायालयात जाणारे हे दुसरेच असतात, काही व्यक्ती तर एकाच विभागात सुमारे 60 पेक्षा अधिक अर्ज टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. न्यायालयात याचिका दाखल केल्यावर कालांतराने ती मागेही घेतली जाते. त्यामुळे अशांच्या बाबतीत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. आरटीआय अंतर्गत अर्ज करण्यास माझा विरोध नसल्याचेही आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केले. परंतु, अशा पध्दतीने एकाच विभागात अर्ज करुन त्रास देणे चुकीचे असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे यावर पोलिसांशी सल्लामसलत करुन, कायदेशीर बाबींचा तपास करुन नियमानुसार कारवाई करण्याचे संकेत त्यांनी दिले होते.