Mon, May 20, 2019 09:04होमपेज › Mumbai-Thane-Raigad › छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

छगन भुजबळ यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Published On: Sep 07 2018 3:46PM | Last Updated: Sep 07 2018 3:46PMमुंबई : प्रतिनिधी

सामाजिक आरक्षणासाठी लागू असलेले २०१४ पूर्वी प्रमाणे तत्व समांतर आरक्षणाला लागू करून एमपीएससी परिक्षेतील खुल्या जागांवर मागासवर्गीय गुणवत्ताधारक महिला, खेळाडू, माजी सैनिक उमेदवारांना नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सामाजिक आरक्षण प्रवर्गातील उमेदवार गुणवत्तेच्या आधारे खुल्या प्रवर्गात निवडले जाऊ शकतात. मात्र सामान्य प्रशासन विभागाच्या १३  ऑगस्ट २०१४ च्या परिपत्रकामुळे सामाजिक आरक्षणाला लागू असलेले तत्व समांतर आरक्षणाला लागू होत नाही. यामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.

शासनाच्या सामान्य प्रशासन विभगाच्या ऑगस्ट २०१४  च्या परिपत्रकामुळे मागासवर्गीय उमेदवारांवर अन्याय होत असल्याने मागासवर्गीय विद्यार्थ्यांना खुल्या भरतीपासून रोखणारे सदर परिपत्रक रद्द करून सुधारित परिपत्रक जारी करण्याच्या सूचना  २७ ऑगस्ट २०१८रोजी  सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी दिल्या होत्या.  याकडे त्यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले आहे.

ऑगस्ट २०१४ मधील परिपत्रकानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून खुल्या प्रवर्गातील आरक्षीत जागांसाठी केवळ खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारांचा विचार केला जात असल्यामुळे मागास प्रवर्गातील उमेदवारांकडे गुणवत्ता असूनही त्यांच्यावर अन्याय होत आहे. गेल्या चार वर्षात खुल्या प्रवर्गातून एमपीएससीची परीक्षा देणाऱ्या मागासवर्गीय उमेदवारांना नोकरीतून डावलण्याची अनेक प्रकरणे झाली असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

समांतर आरक्षणात निवड करतांना जातीचा प्रवर्ग न पहाता मागासवर्गीय महिला, खेळाडू,  माजी सैनिक उमेदवारांची गुणवत्तेनुसार खुल्या (अराखीव) जागांवर निवड करण्यात यावी. ३० टक्के महिला आरक्षणाच्या पदावर सुद्धा मागासवर्गीय महिला उमेदवारांची गुणवत्तेनुसार निवड करण्यात यावी. तसेच मागास प्रवर्गातून जरी अर्ज केला असला तरीही त्यांची निवड प्रथम गुणवत्तेनुसार खुल्या जागांवर करण्यात यावी. यासंदर्भात सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला निर्देश द्यावेत अशी मागणी भुजबळ यांनी केली आहे.