Tue, May 21, 2019 18:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › वर्दी घालून भीक मागू द्या; पोलिसाचे मुख्यमंत्र्यांना पत्र

‘पोलिस गणवेशात भीक मागण्याची परवानगी द्या’

Published On: May 10 2018 9:33AM | Last Updated: May 10 2018 9:33AMमुंबई : पुढारी ऑनलाईन

ऑन ड्युटी २४ तास काम करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने वर्दी घालून भीक मागण्याची परवानगी मागितल्याने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. विभागातील जाचक अटींमुळे पगार न मिळाल्याने पोलिस कर्मचाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच पत्र लिहले आहे.

मरोळ येथे राखीव पोलिस दलात कार्यरत ज्ञानेश्वर अहिरराव यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून पोलिस विभागाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. अहिरराव यांच्या सुट्टया जास्त झाल्याने त्यांचा पगार थांबवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना अर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. तो सोडवण्यासाठी वर्दी घालून भीक मागण्याची परवानगी द्यावी अशी विनंती अहिरराव यांनी केली आहे.

अहिरराव लिहलेल्या पत्रात म्हटले आहे की, मी २० ते २२ मार्च या कालावधीत सुट्टी घेतली होती. दरम्यान पत्नीच्या पायाला दुखापत झाल्याने मला ड्युटीवर जाता आले नाही. याबाबतची कल्पना पोलिस ठाणे अंमलदारांना दुरध्वनीवरुन दिली होती. त्यानंतर मी २८ मार्चला ‘मातोश्री’ येथे ड्युटीवर हजर झालो. त्यानंतर माझ्या वेतनातून कपात होत असलेल्या कर्जाच्या हप्त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली आहे. माझे वेतन लवकर मिळावे म्हणून विचारणा केली असता  वेतन थांबवण्यात आल्याचे सांगितले गेले. माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावरच असल्याने वेतन मिळणे आत्यावश्यक आहे. जर मला ते वेळेत मिळाले नाही तर कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी मला पोलिस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मिळावी ही विनंती.

कुटुंबाचा खर्च भागवणे कठीण
सेवानिवृत्त आई वडिल, पत्नीच्या औषधोपचाराचा खर्च, मुलीच्या शिक्षणाचा खर्च झेपणारा नाही. जर मासिक वेतन मिळाले नाही तर कुटुंबाचा खर्च कसा भागवायचा? या विवंचनेत ज्ञानेश्वर अहिरराव आहेत. त्यामुळेच त्यांनी राज्यपाल, मुख्यमंत्री यांच्यासह मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र पाठवले आहे. 

Tags : Police, Beg, Salary, Write, Letter, CM, Governor, Police Comissioner