Sat, Feb 16, 2019 02:36होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये लेप्टोचा दुसरा बळी

कल्याणमध्ये लेप्टोचा दुसरा बळी

Published On: Sep 05 2018 7:44AM | Last Updated: Sep 05 2018 2:31AMकल्याण : वार्ताहर 

कल्याणात लेप्टोस्पायरोसिसने डोकेवर काढले आहे. कल्याण पूर्वेकडील शास्त्रीनगर परिसरात राहणारी 14 वर्षीय ज्योती यादवचा मंगळवारी लेप्टोने मृत्यू झाला. लेप्टो निष्पन्न झाल्यानंतर तिला डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तिची प्रकृती चिंताजनक झाल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. पण, उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. शहरातील लेप्टोचा हा दुसरा बळी आहे. 

येथील नेतिवली परिसरातील झोपडपट्टीत राहणार्‍या ज्योतीला ताप आल्याने उपचारासाठी डोंबिवलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मागील 8 दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज तिची प्रकृती आणखी बिघडल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिथे तिचा मृत्यू झाला. लेप्टोने मृत्यू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.  

झोपडपट्टीच्या आजूबाजूला असलेले चिखलाचे साम्राज्य, तबेल्यातील प्राण्यांचे उघड्यावर फेकले जाणारे मलमूत्र, वाढलेले उंदीर आणि कचर्‍यांची समस्या याबाबत कारवाई करण्यासाठी माजी स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी यांनी पाठपुरावा केला होता. मात्र, आरोग्य विभागाने याकडे दुर्लक्ष केले असून कचरा नियमित उचलला जात नसल्याचा आरोप शेट्टी यांनी केला.  

या भागात मोठ्या प्रमाणात गुराचे गोठे, तबेले आणि अस्वच्छता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून डेंगी आणि लेप्टो प्रतिबंधक औषधांचे वाटप पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र या औषधांचे सेवन करण्यास नागरिकांकडून टाळाटाळ करण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याचे स्पष्टीकरण पालिकेच्या आरोग्य विभागाने दिले आहे.