होमपेज › Mumbai-Thane-Raigad › पाळीव जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा खात्मा

पाळीव जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याचा खात्मा

Published On: Apr 24 2018 9:53AM | Last Updated: Apr 24 2018 9:53AMडोंबिवली : बजरंग वाळुंज

शेतकऱ्यांकडील जनावरांच्या रक्ताला चटावलेल्या बिबट्याने घनदाट खोंडा जंगलात धुमाकूळ मांडला होता. शेळ्या-मेंढ्यांसह आपल्या गाय आणि बैलाला मारून फस्त केले. यात आपले फार मोठे नुकसान झाल्याने इतरांचे होऊ नये म्हणून आपण पशु भक्षक बिबट्याला गोळ्या झाडून ठार केल्याची खळबळजनक कबूली शार्पशूटर तुक्या उर्फ तुकाराम हरी वीर या 58 वर्षीय आदिवासी शेतकरी वजा शिकाऱ्याने क्राईम ब्रँचच्या चौकशीदरम्यान दिली. क्राईम ब्रँचच्या कल्याण युनीटने बिबट्या आणि वाघाच्या कातडीच्या तस्करी प्रकरणात आणखी एका तस्कराला अटक केली असल्याने या प्रकरणातील आरोपींची संख्या आता चारवर पोहोचली असून वन्य प्राण्यांच्या कातडीचे मोठे रॅकेट हाती लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बिबट्या आणि वाघाच्या कातडीची विक्री करण्यास डोंबिवलीत आलेल्या विशाल धनराज (३०) व सचिन म्हात्रे (३३) या दोघा तस्करांना १९ एप्रिल रोजी बदलापूर पाईप लाईन रोडला कोळे गावाजवळ सापळा लावून अटक करण्यात आली होती. या तस्करांनी तुकाराम वीर याच्याकडून बिबट्याची, तर दत्तू घोलप याच्याकडून वाघाच्या बछड्याची कातडी घेतली होती.

तुकाराम वीर हा रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यातील आंबेवाडी गावचा रहिवाशी आहे. तर अनिल घोलप हा मिरारोडला शांतीनगर परिसरात राहणारा असून तो वाघाच्या कातडीचा तस्कर असल्याचे समोर आले आहे. चौकशीदरम्यान विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे या तस्करांनी दिलेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजू जॉन यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष शेवाळे, जमादार ज्योतीराम सांळुखे, दत्ताराम भोसले, नरेश जोगमार्गे, राजेंद्र घोलप, हरिश्चंद्र बंगारा, राजेंद्र खिलारे, प्रकाश पाटील, अजित राजपूत, सुरेश निकुळे, सतीश पगारे, विश्वास चव्हाण, अरविंद पवार या पथकाने खालापूर तालुक्यातील खोंडा या घनदाट जंगलात शोध मोहीम सुरू केली. या मोहिमेला दोन दिवसांच्या अथक परिश्रमानंतर यश आले. या जंगलातील आंबेवाडी गावठाण हद्दीत राहत असलेल्या तुकाराम वीर याला घरातून अटक केली. 

तुकाराम उर्फ तुक्या वीर हा राहत असलेल्या खोंडा जंगलमध्ये बिबट्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. जंगली प्राण्यांच्या संख्येत घट झाल्याने या जंगलातील बिबटे पाळीव जनावरांवर हल्ले करू लागले आहेत. यातील एका बिबट्याने दोन महिन्यांपूर्वी तुकारामच्या 30 शेळ्या-मेंढ्या फस्त करून शिवाय एक गाय आणि एका बैलाला ठार मारले होते. आपल्या जनावरांचे नुकसान झाल्यामुळे तुकाराम भयंकर चिडला होता. या बिबट्याला ठार मारण्याचा जणू त्याने विडाच उचलला होता. त्यासाठी तो पौर्णिमेच्या रात्रीची वाट पाहत होता. ठार केलेल्या बैलाचे मांस भक्षण करण्यासाठी बिबट्या येणार याची त्याला खात्री पटली होती. त्यासाठी तो एका झाडावर बंदूकीसह दबा धरून बसला होता. बिबट्या त्या मृत बैलाजवळ येताच टॉर्चच्या उजेडाने बिबट्या थबकला. हीच संधी मिळताच तुकारामने त्याला बंदुकीच्या गोळीने अचूक टिपले. तुकाराम हा शार्पशूटर असल्याने गोळी जिव्हारी लागताच बिबट्या जागीच ठार झाला. बिबट्याचे मांस भाजून खाल्ले आणि हाडे व इतर अवयव त्याने मोरबे धरणात  फेकले. तर बिबट्याची कातडी आणि 18 नखे लपवून ठेवली. या वस्तूंना लाखो रूपयांची किंमत मिळत असल्याने तुझे झालेले सर्व नुकसान आम्ही भरून काढू, असे अमिष विशाल धनराज आणि सचिन म्हात्रे या तस्करांनी त्याला दिले. त्यामुळे आपण बिबट्याची नखे स्वतःकडे ठेवून कातडी विक्रीसाठी दिल्याची माहिती तुकाराम याने क्राईम ब्रँचला दिली. तुकारामचे वडील हाऱ्या उर्फ हरी वीर हे देखिल निष्णात शिकारी होते. मात्र तुकारामकडे असलेली बंदूक बेकायदेशीर असल्याचे समोर आले आहे. क्राईम ब्रँचने शार्पशूटर तुक्या वीर याच्याकडून आतापर्यंत कोयता, बंदूक, टॉर्च आणि बिबट्याची 8 नखे हस्तगत केली आहेत. उर्वरित 8 नखांचा शोध घेण्यात येत आहे.

क्राईम ब्रँचने मिरारोडच्या शांतीनगरातून अटक केलेला अनिल घोलप याने वाघाच्या कातड्याची तस्करी केल्याची कबुली दिली आहे. मात्र ही कातडी ज्याच्याकडून घेतली तो राजेश कानोजिया नामक इसम मृत असल्याचे सांगून हा तस्कर उडवाउडविची उत्तरे देत आहे. येत्या दोन दिवसांत ही कातडी त्याने कुणाकडून घेतली हे देखील स्पष्ट होणार असल्याने वपोनी संजू जॉन यांनी सांगितले. या दोघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी कल्याण कोर्टाने सुनावली आहे.