Fri, Feb 22, 2019 04:05होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुलुंंडमध्ये बिबट्याचे सहा तास थरारनाट्य!

मुलुंंडमध्ये बिबट्याचे सहा तास थरारनाट्य!

Published On: Jan 14 2018 1:53AM | Last Updated: Jan 14 2018 1:30AM

बुकमार्क करा
मुंबई : प्रतिनिधी

मुलुंड पूर्वेला नानेपाड्यात शनिवारी सकाळी एक बिबट्या शिरला आणि त्याने तब्बल सहा तास मुलुंडकरांना वेठीस धरले. प्रचंड गर्दीने बिथरलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात सहा जण जखमी झाले. अखेर डार्ट मारून  बेशुद्ध केल्यानंतरच बिबट्या पिंजराबंद झाला आणि मुलुंडकरांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. 

मुंबईतील मुलुंड पूर्व येथील नानेपाडा येथे बिबट्याने हल्ला करून सहा जणांना जखमी केले. नानेपाड्यात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन झाल्याने या परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली असून येथील एका इमारतीत बिबट्या लपून बसल्याने स्थानिक लोक अधिकच घाबरले होते. दरम्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी आणि वन विभागाच्या अधिकार्‍यांनी तब्बल सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर या बिबट्याला जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. बिबट्याने केलेल्या या हल्ल्यात बालाजी कामिटे (40), क्रिसम्मा पल्ले (40), सविता कुटे (30) आणि गणेश पुजारी (45) जखमी झाले आहेत. 

कोंडी बिबट्याची, पंचायत मुलुंडकरांची

मुलुंड : वार्ताहर

शनिवारी सकाळी सात वाजता एका गल्लीतून मातृछाया इमारतीलगतच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न बिबट्याने केला. येथे महिलांनी आरडाओरड केल्याने  आक्रमक होत बिबट्याने रहिवाशांना लक्ष्य केले. 

बाहेर पळून जाण्यास वाट मिळत नसल्याने मातृछायामधील तळमजल्यावर राहणार्‍या गणेश पुजारी यांच्या घरामध्ये बिबट्या घुसला. त्याचवेळी घराबाहेर पडत असलेल्या गणेश पुजारी यांच्यावर त्याने हल्ला केला. घराचा ताबा घेत खिडकीच्या काचा पंजा मारून फोडल्या. भिंतीवर देखील पंजे मारत भिंतीचा काही भाग पाडला. या प्रकारामुळे सर्वांचाच भीतीने थरकाप उडाला होता. या घरात सुमारे पाच तास बिबट्या बसून होता. वन विभागाचे अधिकारी, प्राणिमित्र, पोलिसांचा बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न सुरू होता. वनविभागाच्या अधिकार्‍यांनी बंदुकीद्वारे घराच्या खिडकीतून बिबट्याला भुलीचे इंजेक्शन दिले. 

संपूर्ण परिसरात बघ्यांची एकच गर्दी जमली होती. बिबट्या कोणत्याही क्षणी बाहेर येऊ शकतो या भीतीने सर्व रहिवासी चिंतेत दिसत होते. अखेर काही मिनिटांनी बेशुद्ध झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या अधिकार्‍यांनी पाच तासांच्या अथक प्रयत्नाने जेरबंद केले आणि नागरिकांनी टाळ्या वाजवून सुटकेचा निःश्वास टाकला.