Thu, Apr 25, 2019 18:20होमपेज › Mumbai-Thane-Raigad › गोरेगावच्या एसआरपी कॅम्प व्यायामशाळेत बिबट्या

गोरेगावच्या एसआरपी कॅम्प व्यायामशाळेत बिबट्या

Published On: May 14 2018 1:53AM | Last Updated: May 14 2018 1:15AMजोगेश्वरी : वार्ताहर

गोरेगाव पूर्वेतील एसआरपी कॅम्प राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 8 परिसरातील  व्यायामशाळेत रविवारी पहाटे बिबट्या आढळल्याने एकच खळबळ उडाली होती. दोन तासांच्या अथक प्रयत्नाने नर जातीच्या या बिबट्याला जेरबंद करण्यात रेस्क्यू टीमला यश आले.

व्यायामशाळेच्या खिडकीमधून अचानक बिबट्याने प्रवेश केल्याचे राज्य राखीव दलाच्या एका जवानाला दिसले. त्यांनीच याची माहिती वनविभागाला दिली. एसआरपी कॅम्प परिसरात मोठ्या प्रमाणात राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा वावर असतो. सुदैवाने व्यायामशाळेत पहाटेच्या दरम्यान कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नाही. बिबट्या भक्षाच्या शोधात कॅम्प परिसरात आल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्याला गुंगीचे इंजेक्शन देऊन ठाणे वनविभाग, संजय गांधी नॅशनल पार्क रेस्क्यू टीमने जेरबंद केले. 

एसआरपी कॅम्प परिसरात बघ्यांनी प्रचंड गर्दी केल्याने बिबट्याला पकडणे जमत नव्हते, असे वन अधिकार्‍यांनी सांगितले. संजय गांधी नॅशनल पार्कचे डीसीएफ रामगावकर,  एसीएफ लचके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शैलेंद्र पेठे व आरएफओ वाघमोडे यांनी सुरक्षितरित्या बिबट्याला जेरबंदकेले. त्यानंतर त्याला नॅशनल पार्कमधील रेस्क्यू सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले. सध्या बिबट्याला नॅशनल पार्कमध्ये डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असून तपासणी करून जंगलात सोडण्यात येणार आहे.