होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मंत्रिमंडळ विस्ताराच्या चकव्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी!

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चकव्याने इच्छुकांच्या अपेक्षेवर पाणी!

Published On: Dec 04 2017 1:58AM | Last Updated: Dec 04 2017 1:58AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यापासून मंत्रिमंडळ विस्ताराचा चकवा अजूनही सुरूच आहे. राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतरही मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली दिसत नसल्यामुळे इच्छुकांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

आमदारकीच्या राजीनाम्यानंतर पक्षांतर व त्यानंतर राणेंचा मंत्रिमंडळात समावेश होईल, अशी अटकळ बांधण्यात येत होती; पण शिवसेनेचा विरोध पाहून भाजपने त्यांना पक्षात घेण्याऐवजी स्वतंत्र पक्ष स्थापन करण्याची सूचना केली. या सूचनेच्या पालनानंतर राणे हे एनडीएचे मित्र बनल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावर मोहर उमटेेल, अशी चर्चा सुरू झाली. गेल्या आठवड्यात राणेंच्या रिक्‍त जागेसाठी निवडणूक झाली; पण मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काहीही हालचाल दिसत नाही. त्यामुळे मंत्रिपदाचे स्वप्न पाहणार्‍या भाजपसह मित्रपक्षांच्या आमदारांना आता मंत्रिमंडळ विस्तार बेभरवशाचा वाटू लागला आहे.

भाजपचे आमदार डॉ. अनिल बोंडे यांनाही मंत्री होण्याची इच्छा लपविणे कठीण झाले आहे. अपक्ष आमदार असतानाही आपण भाजपला समर्थन देत होतो. आता थेट भाजपमध्ये आल्यामुळे त्यांनीसुद्धा मंत्रिपदासाठी दंड थोपटण्यास सुरुवात केली आहे. तर सध्या राज्यमंत्री असलेल्यांना कॅबिनेटची स्वप्ने पडत आहेत. विदर्भाचा कोटा फुल्ल आहे. तरीसुद्धा त्या विभागातील आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे फिल्डिंग लावली आहे.

शिवसेनेने विधान परिषदेतील सदस्यांनाच मंत्रिपदे दिल्यामुळ लोकांमधून निवडून येणार्‍या आमदारांमध्ये नाराजी आहे. दोन वर्षांनी त्यांना पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. हे लक्षात घेऊन मंत्रिमंडळ विस्तारात नवीन चेहर्‍यांना संधी देण्यासाठी शिवसेनेच्या दोन कॅबिनेट मंत्र्यांची विकेट जाणार असल्याचे बोलले जात असले तरी विधान परिषद सदस्या डॉ. नीलम गोर्‍हे यांचे विस्तारामध्ये नाव घेतले जात आहे. सर्वच पक्षांकडून इच्छुकांना आश्‍वासने दिली जात आहेत. गेल्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी पुडी सोडून देण्यात आली होती. आता अधिवेशनासाठी जेमतेम आठवडा उरला असल्यामुळे ही पुडीसुद्धा चकवा ठरण्याची चिन्हे दिसू लागल्याने इच्छुकांमध्ये नाराजी पसरली आहे.