Tue, Apr 23, 2019 20:16होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषद निवडणूक : विरोधकांची १५ मते फुटली!

विधान परिषद निवडणूक : विरोधकांची १५ मते फुटली!

Published On: Dec 08 2017 2:01AM | Last Updated: Dec 08 2017 2:01AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

गेल्या अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपाचे प्रसाद लाड यांनी विरोधकांना जोरदार हादरा देत काँगेे्रस-राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप माने यांचा दारूण पराभव केला. या निवडणुकीत लाड यांना 209 तर माने यांना अवघी 73 मते मिळाली. दोन मते बाद झाली आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीची 15 मते फुटली असून या निकालाने दोन्ही पक्षांचे नेते हवालदिल झाले आहेत. 

नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फिल्डींग लावूनही मते फुटल्याने आता दगाबाज आमदार कोण याची या दोन्ही पक्षांमध्ये जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश आणि राणेसमर्थक कालिदास कोळंबकर या दोघांची मते भाजपलाच मिळाली. अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे आमदार रमेश कदम मतदानासाठी विधानभवनात आले होते. आपण लाड यांनाच मतदान केल्याचे कदम यांनी जाहीरपणे सांगितले. 

राष्ट्रवादीचे छगन भुजबळ  हे तुरुंगात आहेत. तर एमआयएमने या निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याने आमदार वारिस पठाण आणि इम्तियाज जलील यांनी मतदानाला दांडी मारली. शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द झाल्याने त्यांनी मतदान केले नाही.

प्रसाद लाड यांना भाजप 122, शिवसेना 63, बहुजन विकास आघाडी (तीन), अपक्ष (7), मनसे (एक) अशी 196 मते मिळतील असा अंदाज होता. मात्र त्यापेक्षा तब्बल नऊ मते अधिक मिळवून भाजपने विरोधकांना धूळ चारली. यात मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांनी एकहाती राबविलेले डावपेच कामी आल्याचे बोलले जाते. 

शिवसेनेचे मतदान फुटु नये, यासाठी उद्धव ठाकरे यांचे पीए मिलींद नार्वेकर यांनाच पक्षाने लाड यांचे पोलींग एजंट म्हणून नेमले होते. तर भाजपचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट हेसुध्दा मतदान केंद्रात तळ ठोकून होते. यावेळी राज्यात प्रथमच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नोटाचा (यापैकी एकही नाही) पर्याय देण्यात आला होता.

विधानभवन परिसरात जोरदार घोषणाबाजी

मतमोजणी संपल्यानंतर विजयी झालेले प्रसाद लाड विधानभवन बाहेर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावांचा जयजयकार करत या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजीही केली. लाड यांचा विजय पाहण्यासाठी त्यांच्या पत्नी निता, पुत्र शुभम व कन्या सायली हे विधानभवन परिसरात आले होते.

लाड हे मुंबई बँकेचे संचालक आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालकांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. निकाल लागल्यानंतर बाहेर आलेल्या लाड यांचे बँकेचे अध्यक्ष आमदार दरेकर, उपाध्यक्ष पुरुषोत्तम दळवी, संचालक नितीन बनकर, विठ्ठलराव भोसले, जिजाबा पवार यांनी विधानभवनाच्या प्रांगणात अभिनंदन केले.