Thu, Jun 27, 2019 17:46होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना धक्का; शिवसेनेलाही इशारा

मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना धक्का; सेनेलाही इशारा

Published On: Dec 08 2017 1:40AM | Last Updated: Dec 08 2017 9:41AM

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी 

विधान परिषद पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 15 मते फोडून विरोधकांबरोबरच शिवसेनेलाही धक्का दिला. शिवसेनेने सरकारचा पाठिंबा काढलाच तर भाजप स्वबळावर सत्ता टीकवू शकेल, असा संदेश या निकालाने दिला आहे. 

प्रसाद लाड यांचा विजय ही औपचारिकता असली तरी विरोधकांची किती मते फुटतात याचीच उत्सुकता होती. अपेक्षेप्रमाणे आघाडीची जवळपास 15 मते फुटली. काँग्रेसची 42, राष्ट्रवादी काँग्रेस 41, शेकापची 3, सपा 1 आणि माकप 1 मिळून किमात 88 मते मिळणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात दिलीप माने यांना 73 मते मिळाली. आघाडीच्या घटक पक्षांनी दगाफटका केलाच पण काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची किमान दहा मते फुटल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शिवसेना सत्तेत राहूनही भाजपला टार्गेट करीत आहे. या निवडणुकीत भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी देण्याची तयारी केली होती. मात्र, शिवसेनेने विरोध केला. त्यामुळे राणेंचा पत्ता कटला. राणेंना मंत्रिमंडळात घेतल्यास सरकारचा पाठिंबा काढण्याची धमकीही शिवसेनेने दिली आहे. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी 14 मते फोडून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या इशारा दिला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांच्यापेक्षा भाजपने यावेळी अधिकची मते फोडली. त्यामुळे शिवसेनेने पाठिंबा काढला तरी सरकार तरेल हे दुसर्‍यांदा स्पष्ट झाले आहे. सेनेने पाठिंबा काढला तर अदृश्य हात सरकार वाचवतील, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच म्हटले आहे. शिवसेनेचेही काही आमदार संपर्कात असल्याचा इशारा भाजपकडून दिला जात आहे.

राणेंचा काँग्रेसला दणका 

नारायण राणे यांनी काँग्रेसला या निवडणुकीत दणका दिल्याचे स्पष्ट झाले. त्यांचे पुत्र आमदार नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांनी प्रसाद लाड यांना मतदान केल्याचे स्पष्ट झाले. त्याची अप्रत्यक्ष कबुलीच दोघांनी मतदानानंतर दिली. मी नारायण राणे यांचा कार्यकर्ता आहे. हात माझा असला तरी डोके राणे साहेबांचे आहे. माझे मत कोणाला हे जगजाहीर आहे असे सांगतानाच माझ्यावर कारवाई करण्याची कोणी हिम्मत तर करु द्या मग बघू, असे आव्हान नितेश राणे यांनी काँग्रेसला दिले. 

रमेश कदमांचे लाडांना मतदान

अण्णाभाउ साठे आर्थिक विकास महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांनी देखील प्रसाद लाड यांना मतदान केले. मी माझे मत प्रसाद लाड यांना दिले. त्यासाठी माझ्यावर कोणाचाही दबाव नव्हता, असे कदम यांनी मतदानानंतर सांगितले. कदम यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतही रामनाथ कोविंद यांच्या बाजुने मतदान केले होते. 

काँग्रेसची चाचपणी

प्रसाद लाड यांचा विजय पक्का असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने ही निवडणूक बिनविरोध होउ दिली नाही. नारायण राणे फुटल्यानंतर किती आमदार त्यांच्यासोबत आहेत याची चाचपणी या निवडणुकीतून काँग्रेसने केल्याचे बोलले जात आहे. नितेश राणे आणि कोळंबकर यांनी उघडपणे दिलीप माने यांच्याविरोधात मतदान केल्याने त्यांच्याबाबत काँग्रेस कोणते पाउल उचलते हे लवकरच स्पष्ट होणार आहे. आणखी कोणती मते फुटली याचाही शोध दोन्ही काँग्रेसकडून घेतला जाणार आहे.

संबंधित बातम्या :
विधान परिषद निवडणूक : विरोधकांची १५ मते फुटली!
विधान परिषदेचा 'प्रसाद' लाड यांना