होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधान परिषद; ४ जागांसाठी २५ जूनला निवडणूक

विधान परिषद; ४ जागांसाठी २५ जूनला निवडणूक

Published On: May 25 2018 1:24AM | Last Updated: May 25 2018 1:24AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर व शिक्षक, कोकण पदवीधर तसेच नाशिक शिक्षक मतदार संघासाठी येत्या 25 जून रोजी निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीसाठी 7 जून ही उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख असून, 28 जूनला निकाल जाहीर होणार आहेत. ही निवडणूकही चुरशीची होण्याची शक्यता आहे.

मुंबई पदवीधर मतदार संघाचे आमदार राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, मुंबई शिक्षक मतदार संघाचे आमदार कपिल पाटील, नाशिक शिक्षक मतदार संघाचे आमदार अपूर्व हिरे आणि कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. या जागांसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. या निवडणुकीची अधिसूचना 31 मे रोजी जाहीर केली जाणार आहे. 7 जूनला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर 8 जूनला या उमेदवारी अर्जांची छाननी केली जाणार आहे. तर 11 जूनला उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. 25 जूनला सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. तर 28 तारखेला मतमोजणी केली जाईल. या निवडणुकीपूर्वीच कोकण पदवीधर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला आहे. त्यामुळे तेथे राष्ट्रवादीला उमेदवार शोधावा लागणार आहे. याशिवाय शिवसेना आणि शेकापही ही निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर मुंबई पदवीधर मतदार संघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. शिवसेनेकडून पुन्हा एकदा डॉ. दीपक सावंत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.