होमपेज › Mumbai-Thane-Raigad › प्रतिष्ठेच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल आज

प्रतिष्ठेच्या विधान परिषद निवडणुकांचा निकाल आज

Published On: May 24 2018 1:58AM | Last Updated: May 24 2018 1:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी 

सार्‍याच पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल गुरुवारी 24 तारखेला लागणार आहे. मात्र, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा ठरविणार्‍या बीड — लातूर — उस्मानाबाद मतदारसंघाची मतमोजणी मात्र अनिश्‍चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. केेंद्रीय निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला असून मतमोजणीची तारीख नंतर ठरविण्यात येणार आहे. 

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहा मतदारसंघांसाठी 21 तारखेला मतदान झाले होते. रायगड - रत्नागिरी - सिंधुदुर्ग, नाशिक, अमरावती, परभणी - हिंगोली, चंद्रपूर - गडचिरोली आणि बीड - लातूर -उस्मानाबाद या मतदारसंघांचा त्यामध्ये समावेश होता. सर्वच मतदारसंघांमध्ये चुरशीची निवडणूक झाली. 

विशेषत: बीड - लातूर - उस्मानाबाद आणि नाशिक मतदारसंघ जास्तीच चर्चेत राहिले. बीड -लातूर - उस्मानाबादमधून माजी राज्यमंत्री सुरेश धस यांना भाजपने उमेदवारी दिली. या मतदासंघात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे संख्याबळ जास्त आहे. परंतु, पंकजा मुंडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीचा उमेदवार त्यांनी स्वगृही परत आणला. त्यानंतर बीड नगरपरिषदेच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनाही अपात्र ठरविण्यात आले होते. 

दुसरीकडे धनंजय मुंडे यांनीही ही निवडणूक जिंकण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, या निवडणुकीचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. त्याबाबतचे पत्र केंद्रीय निवडणूक आयोगाने बुधवारी सायंकाळी जारी केले.मतमोजणी केव्हा होणार हे निश्‍चित नाही. मात्र, नगरसेवकांना राज्यमंत्र्यांकडून अपात्र ठरविण्याच्या मुद्यावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या नगरसेवकांनी मतदान केले असले तरी न्यायालयाने मतमोजणीबाबत काही निर्देश दिले आहेत. ते पहाता या मतदारसंघाची मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या सुत्रांनी दिली.