Tue, May 26, 2020 14:59होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर

विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर

Last Updated: Apr 04 2020 7:41PM
मुंबई : पुढारी ऑनलाईन

विधानसभा सदस्याद्वारे निवडून आलेल्या विधानपरिषदेतील ९ सदस्यांच्या सदस्यत्वाची मुदत येत्या २४ एप्रिल रोजी संपत असल्याने कोरोनाच्या पाश्वभूमिवर भारत निवडणूक आयोगाने राज्य विधानपरिषदेची निवडणूक लांबणीवर टाकली आहे.        

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. त्यांना २८ मे रोजी सहा महीने पूर्ण होणार आहेत. त्यापूर्वीच त्यांना एखाद्या सभागृहाचे सदस्य होणे आवश्यक आहे. या माध्यमातून ते विधानपरिषदेत जाणार होते. पण निवडणूक आयोगाने सध्या देशात आणि राज्यात असलेल्या कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर अनिश्चित कालावधीसाठी ही निवडणूक पुढे ढकलली. यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आणि सरकारपुढे पेच निर्माण झाला आहे.

२४ एप्रिल रोजी मुदत संपणार्‍यांमध्ये राष्ट्रवादीचे सदस्य हेमंत टकले, आनंद ठाकूर, किरण पावसकर, काँग्रेसचे हरिभाऊ राठोड, शिवसनेच्या नीलम गो-हे, भाजपचे अरूण अडसड, पृथ्वीराज देशमुख, स्मिता वाघ यांचा समावेश आहे.

बिहारमध्येही ६ मे रोजी विधानपरिषदेचे ९ सदस्य निवृत्त होणार आहेत. आयोगाने तेथीलही निवडणूक पुढे ढकलली आहे. निवडणुकांमध्ये निवडणूक अधिकारी, राजकीय पक्षांचे नेते, सहाय्यक अधिकारी, विधानसभा सदस्य यांचा प्रत्यक्ष सहभाग येत असल्याने त्याच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ नये, तसेच सार्वजनिक सुरक्षा अबाधित रहावी आणि आरोग्याचा धोका टाळण्यासाठी या निवडणुका नियोजित वेळेत पार पाडल्या जावू शकत नसल्याचे केंद्रिय निवडणूक आयोगाने आदेशात म्हटले.