Wed, Mar 27, 2019 02:01होमपेज › Mumbai-Thane-Raigad › अर्ज शिवसेनेनेही घेतल्याने भाजपमध्ये धाकधूक

अर्ज शिवसेनेनेही घेतल्याने भाजपमध्ये धाकधूक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : विशेष प्रतिनिधी

नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी 7 डिसेंबर रोजी निवडणूक होणार असून काँग्रेसकडून दिलीप माने तर भाजपाकडून पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी व प्रसाद लाड यांच्या नावांची चर्चा असल्याचे समजते. अशा स्थितीमध्ये युतीमधील शिवसेनेनेही उमेदवारी अर्ज नेल्यामुळे भाजपाच्या गोटात चिंता निर्माण झाली आहे. 

एनडीएचा नवा भिडू असलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नावाची या निवडणुकीतील उमेदवार म्हणून चर्चा होती. राणे यांनी राजीनामा दिल्यापासून त्यांचेच नाव आघाडीवर होते. त्यामुळे भाजपा किंवा एनडीएमधील घटक पक्ष असलेल्या एकाही पक्षाकडून नाव पुढे केले जात नव्हते. पण शिवसेनेच्या प्रखर विरोधामुळे राणे यांचे नाव मागे पडले होते. या नावावरून युतीमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. अखेरीस भाजपाचे प्रवक्ते भांडारी यांचे नाव पुढे आले आहे. 

उमेदवारी अर्ज भरण्याची 27 डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. या पार्श्‍वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी रविवारी काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री नसीम खान आदी नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून तीन जण इच्छुक असल्याचे समजते. त्यामध्ये दक्षिण सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने यांचे नाव आघाडीवर आहे. या चार इच्छुकांची नावे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सुचविण्यात आली आहेत. दिल्लीहून सोमवारी सकाळी 11 वाजेपर्यंत नाव जाहीर केल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार अर्ज भरेल, अशी माहिती एका नेत्याने दिली.

भाजपाकडून पक्षाचे प्रवक्ते भांडारी यांचे नाव घेतले जाते. विधान परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीच्यावेळी त्यांचे नाव चर्चेत असते. आता त्यांच्या नावासह प्रसाद लाड यांचेही नाव घेतले जात आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला राष्ट्रवादीचे सर्वच आमदार मते देतील, अशी शक्यता नाही. लाड यांना उमेदवारी दिल्यास ते राष्ट्रवादीच्या आमदारांची मते आपल्याकडे खेचू शकतील, असे बोलले जाते. भाजपाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची वर्षावर रविवारी रात्री बैठक झाली. सोमवारी सकाळी भांडारी किंवा लाड यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.