Sun, May 26, 2019 12:38होमपेज › Mumbai-Thane-Raigad › विधानपरिषद : ११ जागांसाठी १६ ला निवडणूक 

विधानपरिषद : ११ जागांसाठी १६ ला निवडणूक 

Published On: Jun 23 2018 1:21AM | Last Updated: Jun 23 2018 12:58AMमुंबई : विशेष प्रतिनिधी

विधानसभा सदस्यांमधून निवडून द्यावयाच्या विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत पक्षाचे तिकीट मिळविण्यासाठी सर्वच पक्षात इच्छुकांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. 

भाजपचे भाई गिरकर, राष्ट्रवादीचे सुनील तटकरे, जयदेव गायकवाड, माथाडी नेते नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, शिवसेनेचे अनिल परब, रासपचे महादेव जानकर आणि शेकापचे जयंत पाटील यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत 27 जुलै रोजी संपत आहे. त्यामुळे रिक्त होणार्‍या जागांसाठी 16 जुलै रोजी निवडणूक आयोगाने निवडणूक जाहीर केली आहे. 

या निवडणुकीत निवडून येण्यासाठी किमान 27 मतांची आवश्यकता आहे. काँग्रेस- राष्ट्रवादीचे 7 सदस्य निवृत्त होत असताना संख्याबळ पहाता दोघांचे मिळून तीनच सदस्य निवडून जाणार आहेत. त्यातच शेकापचे जयंत पाटीलही काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीकडेच तिकीट मागू शकतात. त्यामुळे दोन्ही पक्षातील विद्यमान सदस्यांचा पत्ता कट होणार आहे. राष्ट्रीवादीतून सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची स्पष्ट शक्यता असल्याने जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत यांचा पत्ता कट होणार आहे. नरेंद्र पाटील हे भाजपच्या संपर्कात आहेत. 

काँग्रेसमध्येही विधानपरिषदेचे उपसभापती असलेल्या माणिकराव ठाकरे यांची वर्णी निश्‍चित आहे. शरद रणपिसे, संजय दत्त यांचा पत्ता कापला जाणार आहे. शिवसेनेचे अनिल परब यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते. तसेच शिवसेनेचा आणखी एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो. भाजपचे चार ते पाच सदस्य विधानपरिषदेवर पोहचू शकतात. भाजपला महादेव जानकर यांना तिकीट द्यावे लागणार आहे. उर्वरित जागांसाठी भाजपमध्ये स्पर्धा रंगणार आहे. 

निवडणूक कार्यक्रम

28 जून रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. 5 जुलै उमेदवारी दाखल करण्याची अंतिम मुदत असून, 6 जुलैला छाननी करण्यात येईल. 9 जुलै उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.तर 16 जुलै रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत मतदान घेण्यात येऊन त्याच दिवशी मतमोजणी करण्यात येईल.