Tue, May 30, 2017 04:09
29°C
  Breaking News  


होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठा मोर्चातून मूक शब्द वगळला

३० मेला मराठा समाजाचा मंत्रालयावर धडक मोर्चा

By pudhari | Publish Date: May 20 2017 9:09AM

मराठा मोर्चातून मूक शब्द वगळला


मुंबई : प्रतिनिधी

सरकार दरबारी वारंवार मोर्चे  काढून आणि विनंत्या करूनही मराठा समाजाला आरक्षण दिले जात नसल्याने आता मराठा समाजाने आपल्या मोर्च्यातून मूक,  हा शब्द वगळला आहे. येत्या 30 मे रोजी सकल मराठा समाजाचा मंत्रालयावर धडकमोर्चा काढला जाणार असल्याची माहिती सकल मराठा क्रांती महामोर्चाचे निमंत्रक प्रा.संभाजी पाटील यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

महाराष्ट्रात बहुसंख्य असलेला मराठा समाज हा आज प्रत्येक क्षेत्रात अत्यंत मागासलेला आहे, म्हणून मराठा समाजास आरक्षणाची अत्यंत गरज आहे, परंतु, शासनाकडून मराठा आरक्षणाच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची ठोस पाउले उचलली गेलेली नाहीत.  मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्‍न तसाच सरकार दरबारी पडून आहे.

गेल्या वर्षभरात राज्यभरात मराठा क्रांती मोर्चा समितीतर्फे ठिकठिकाणी शेकडो मोर्चे काढण्यात आले. तसेच मागील वर्षी 30 मे रोजी 2016 ते 5 जून 2016 पर्यत मराठा आरक्षणाकरीता करण्यात आलेल्या आमरण उपोषणाच्या दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शब्द दिला होता  की आरक्षणाचा प्रश्‍न हा येत्या शैक्षणिक वर्षाच्या अगोदर निकाली काढण्यात येईल. परंतु, त्यांच्याकडून मराठा समाजास दिलेला शब्द पाळला गेला नाही, यामुळे नाईलाजास्तव आम्हांला रस्त्यावर उतरावे लागले आहे. येत्या 30 मे रोजी दुपारी 12 वाजता आझाद मैदान ते मंत्रालय असा भव्य महामोर्चा काढला जाणार आहे, असे प्रा.संभाजी पाटील यांनी सांगितले.

मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेस  प्रो.सुभाष भोसले, अविनाश पवार, संदिप जाधव, दत्तात्रय सुर्यवंशी, लक्ष्मण पिसाळ, रामेश्‍वर शेजवळ आदी मान्यवर उपस्थित होते.