Tue, Oct 24, 2017 16:59
29°C
  Breaking News  

होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुख्यमंत्री तरुणांसाठी दीपस्तंभ : निकम

मुख्यमंत्री तरुणांसाठी दीपस्तंभ : निकम

Published On: Aug 13 2017 2:08AM | Last Updated: Aug 13 2017 1:39AM

बुकमार्क करा

मुंबई :  प्रतिनिधी 

राजकारण वाईट असते अशी प्रतिमा तयार झाली आहे. मात्र राजकारणात चांगल्या व्यक्तींनी येण्याची आवश्यकता आहे. देशाच्या व राज्याच्या प्रगतीसाठी, विकासासाठी ते आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याप्रमाणे चांगल्या व्यक्तीदेखील राजकारणात आहेत. फडणवीस हे राज्यातील तरुणांसाठी दीपस्तंभ आहेत, अशा शब्दांत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी फडणवीस यांच्याबाबत कौतुकोद्गार काढले. आदर्श राजकारणी म्हणून फडणवीस हे चांगले उदाहरण असल्याचे ते म्हणाले. 

फडणवीस यांच्या नगरसेवक ते मुख्यमंत्री या राजकीय प्रवासाला 25 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने एका विशेषांकाचे प्रकाशन शनिवारी दादर येथील सावरकर सभागृहात करण्यात आले, त्यावेळी निकम प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अ‍ॅड. आशिष शेलार, भाजपचे प्रवक्ते आमदार अतुल भातखळकर, पत्रकार भाऊ तोरसेकर, सतीश कुलकर्णी, डॉ. गिरीश दाबके, विजय लेले उपस्थित होते. 

निकम म्हणाले, मुख्यमंत्री उत्कृष्ट राजकारणी आहेतच सोबत ते चांगले बुध्दिबळपटू आहेत. बुध्दिबळाच्या खेळाप्रमाणे कोणत्या वेळी कोणते प्यादे पुढे करावे,  याचे चांगले ज्ञान त्यांना आहे. मुख्यमंत्री कधीकधी सामाजिक स्वास्थाचा विचार करून आरोपींना कोणती शिक्षा होईल हे जाहीर करतात, मात्र त्यांच्या घोषणेमुळे माझ्यावर मात्र प्रचंड मोठा दबाव येतो. मुंबईतील दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानला पुरावा देण्यासाठी डेव्हिड हेडली याची साक्ष घेण्यामध्ये आवश्यक ती मदत मुख्यमंत्र्यांनी केल्याचा उल्लेख त्यांनी केला. देशातील सध्याच्या वातावरणात नागरिक म्हणून जबाबदारीने काम करण्याची गरज आहे. सर्वधर्मसमभावपणाची भावना जोपासण्याची गरज आहे. ही परिस्थिती टिकेल यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. विद्यमान मुख्यमंत्री त्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे निकम म्हणाले. 

अत्यंत चांगल्या माणसावर चांगला अंक काढण्यात आल्याचे अतुल भातखळकर म्हणाले. 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये फडणवीस हे 100 टक्के निष्कलंक आहेत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या व भाजपच्या संस्काराशिवाय हे शक्य नाही, असे ते म्हणाले. 

सतीश कुलकर्णी म्हणाले, सरकारने वैज्ञानिक क्षेत्रामध्ये कोणतीही कपात केलेली नसून वैज्ञानिकांच्या मोर्चामागे पश्‍चिम बंगालची चिथावणी असल्याचा सूचक आरोप त्यांनी केला. देशातील शास्त्रज्ञांना संशोधन प्रकल्पासाठी स्वतः निधी उभारण्याची सवय नसल्याने त्यांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केल्याचा दावा त्यांनी केला.