Fri, Nov 24, 2017 20:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई विमानतळावरून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

मुंबई विमानतळावरून लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला अटक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

मुंबई : प्रतिनिधी

नऊ वर्षांपूर्वी रामपूरच्या सीआरपीएफ लष्करी कॅम्पमध्ये  झालेल्या‘आत्मघातकी’ हल्ल्यातील सूत्रधार असलेला लष्कर-ए-तोयबाचा संशयित अतिरेकी सलीम ऊर्फ आबू ऊर्फ आमीर ऊर्फ सलीम मोहम्मद मुकीम खान याला सोमवारी येथील छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर महाराष्ट्र आणि युपीच्या एटीएस अधिकार्‍यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत अटक केली. सलीम हा तोयबाचा सदस्य असून त्याच्या अटकेने तोयबाला जबरदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. अटकेनंतर सलीमला विमानाने उत्तर प्रदेशात नेण्यात आले असून मंगळवारी त्याला तेथील विशेष कोर्टात हजर केले जाणार आहे. 

1 जानेवारी 2008 साली उत्तर प्रदेशच्या रामपूर लष्करी कॅम्पमध्ये लष्करी वेशात आलेल्या काही अतिरेक्यांनी फिदायीन हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर कौसर आणि शरीफ नावाच्या दोन संशयित अतिरेक्यांना उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकार्‍यांनी अटक केली होती. त्यांच्या चौकशीत प्रथम सलीम खान याचे नाव आले होते. कौसर, शरीफ आणि सलीम हे दोघेही काही वर्षांपूर्वी पाकिस्तानात गेले होते. तेथील मुजफ्फदाराबाद येथे या तिघांनी तोयबाकडून अतिरेकी प्रशिक्षण घेतले होते. रामपूरमध्ये झालेल्या फिदायीन हल्ल्यानंतर सलीमसह इतर सर्व अतिरेकी पळून गेले होते. त्यापैकी कौसर आणि शरीफ पकडले गेले तर सलीम हा विदेशात पळून गेला होता. गेल्या काही वर्षांपासून तो पाकिस्तान आणि युएईमध्ये वास्तव्यास होता.

 गेल्या नऊ वर्षांपासून तो भारतीय गुप्तचर यंत्रणेच्या रडारवर होता. तो युएईमध्ये असल्याची माहिती मिळताच त्याच्यावर भारतीय गुप्तचर यंत्रणेने कारवाई करण्याचाही प्रयत्न केला होता.  मात्र तो तेथूनही निसटला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध युपी एटीएसने रेड कॉर्नर नोटीस तसेच लुक आऊट नोटीस जारी केले होते. सोमवारी तो छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळताच युपी एटीएस पोलिसांची एक टीम मुंबईत दाखल झाली. 

या पथकाने जुहू एटीएस पोलिसांची मदत घेऊन आंतरराष्ट्रीय विमानतळावर साध्या वेशात पाळत ठेवली होती. युएई येथून आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरताच त्याला या अधिकार्‍यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला युपी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. सायंकाळी त्याला पुढील चौकशीसाठी उत्तर प्रदेशात नेण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सलीम हा तोयबासाठी काम करीत होता. तोयबाच्या काही अतिरेक्यांचा खास माणूस म्हणून तो परिचित होता. त्याने तोयबासाठी हेरगिरी करणार्‍यांना आर्थिक मदत केली होती. यापूर्वी युपी एटीएसने संदीप शर्मा नावाच्या एका तरुणाला अटक केली. संदीप हा तोयबासाठी काम करीत होता. त्याचे एका काश्मीरी तरुणीशी प्रेम होते. 

तिच्या प्रेमाखातर तिच्या कुटुंबियांच्या सांगण्यावरुन तोयबामध्ये सामिल झाला होता. त्यानंतर तो याच संघटनेसाठी काम करु लागला. अतिरेक्यांसाठी कार चालविण्याचे काम तो करीत होता. काश्मीरमध्ये काही पोलिसांच्या झालेल्या हत्या तसेच बँक दरोड्यातही संदीपचा सहभाग आहे. संदीपनंतर आता सलीम खान पकडला गेल्याने तोयबाला जबदस्त हादरा बसल्याचे बोलले जाते. सलीमच्या चौकशीत अनेक धक्कादायक माहिती उघडकीस येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्याने उत्तर प्रदेशातील काही तरुणांना तोयबामध्ये सामिल करण्यासाठी प्रयत्न केले होते. त्याला हवालामार्फत कोणाकडून पैसे येत होते, ते पैसे तो कोणाला देत होता, याची सविस्तर माहिती काढण्याचा युपी एटीएसचे अधिकारी प्रयत्न करीत आहेत.