Sat, Jul 04, 2020 15:09होमपेज › Mumbai-Thane-Raigad › क्वारंटाईन सेंटरच्या जेवणात चक्क अळ्या निघाल्या!

क्वारंटाईन सेंटरच्या जेवणात चक्क अळ्या निघाल्या!

Last Updated: Jun 05 2020 1:13AM
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

क्वारंटाईन सेंटरवर दाखल झालेल्या रुग्णांना देण्यात येणार्‍या सकस जेवणामध्ये चक्क अळ्या आणि माशा सापडल्याचे तीन धक्कादायक प्रकार मुंबईत गुरुवारी समोर आले. एक चेंबरमध्ये, दुसरा पवईमध्ये आणि तिसरा तर केईएम रुग्णालयात!   

1. चेंबूर मफएम वेस्टफफ विभागात विष्णू नगर , न्यु म्हाडा कॉलनी या ठिकाणी पालिकेचे हे क्वारंटाईन सेंटर आहे. या सेंटर मध्ये चेंबूर परिसरातील 110 हुन अधिक लोक दाखल आहेत. सेंटरमधील लोकांना सकाळ, संध्याकाळ नाष्टा, दुपारचे आणि रात्रीचे जेवण पालिकेकडून दिले जाते. बुधवारी दिलेल्या जेवणात अळ्या आणि माशा दिसून आल्या. हे लक्षात येण्यापूर्वी काही लहान मुलांनी हे अन्न खाल्ले होते त्यांना उलट्या झाल्या. शिवाय इथले पाणी देखील घाण असलाच्या तक्रारी रुग्ण करत आहेत. क्वारंटाईन सेंटर मध्ये उत्कृष्ट सेवा देत असल्याचा दावा जरी पालिका करत असली तरी चेंबूर मधील या प्रकाराने पालिकेचे पुरते वस्त्रहरण झाले आहे. जेवणाबद्दल तक्रारी येताच जेवण देणारा ठेकेदार बदलण्यात आल्याची माहिती सहाय्यक अधिकारी पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.

2. केईएम रुग्णालयात बुधवारी कोरोना वॉर्ड मध्ये जेवणात आलेल्या शीर्‍यामध्येही अळ्या आढळल्या. केईएमच्याच कर्मचार्‍यांनी काही लोकप्रतिनिधी तसेच कर्मचारी संघटनांना हा प्रकार कळवला. मनसे पालिका कर्मचारी सेनेचे उपाध्यक्ष दिलीप दळवी यांनी सांगितले की, आम्ही केईएम रुग्णालयाला जेवण देणार्‍या कॅटरसची चौकशी करून  कारवाई करण्याची मागणी करण्यासाठी अधिष्ठात्यांशी संपर्क केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

3. पालिका एस विभागाच्या हद्दीत असलेल्या पवई हिरानंदानी येथील म्हाडा च्या इमारती मध्ये पालिकेने तयार केलेल्या  विलगीकरण कक्षामधील जेवण पुन्हा एकदा वादात आले आहे. कधी आंबलेला नाश्ता, कधी जेवणात किडे, कधी संध्याकाळ पर्यंत जेवणच न मिळणे असे प्रकार घडत असताना बुधवार दुपारी आलेल्या जेवणात अळी निघाली. या जेवनात वरण,भात ,भाजी  देण्यात आली होते. तेवढ्यात एका महिला रुग्णाला वरणात एक अळी दिसली. हा प्रकार अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिला तरी कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. एस विभागाच्या हद्दीत हे केंद्र येते. या विभागाचे सहायक आयुक्त संतोष कुमार धोंडे यांनी मोठा अजब प्रश्न उपस्थित केला. या विलगीकरण केंद्रात सोळाशे लोक आहेत. मात्र या जेवणात फक्त एकालाच अळी दिसली. इतर कोणाच्याच जेवणात ती का दिसली नाही? एकाच्याच म्हणण्यानुसार कारवाई कशी करावी, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. विशेष म्हणजे अळी दिसली म्हणून तक्रार करणार्‍या संशयित रुग्णाला या केंद्रातून हलविण्यात आले आहे.