Wed, Aug 21, 2019 03:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › जगातील सर्वांत मोठ्या मेंदूच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

जगातील सर्वांत मोठ्या मेंदूच्या गाठीची यशस्वी शस्त्रक्रिया

Published On: Feb 22 2018 9:33AM | Last Updated: Feb 22 2018 9:33AMमुंबई : प्रतिनिधी

जगातील सर्वात मोठ्या म्हणजेच डोक्याच्या आकाराएवढ्या मेंदुच्या गाठीचे शस्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या निर्मूलन करण्यात डॉक्टरांना यश आले. मुंबईच्या नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. डॉक्टरांचा दावा आहे की हा ब्रेन ट्युमर जगभरातील सर्वात जास्त वजनाचा ट्युमर आहे. उत्तरप्रदेशातील संतलाल पाल गेली चार वर्ष डोक्यावर ही गाठ घेऊन जगत होता. या ट्युमरचे वजन तब्बल 1.873 किलो इतके आहे. संतलालवर सध्या नायर रुग्णालयात उपचार  रु आहेत.

उत्तप्रदेशातून नायर रुग्णालयात संतलाल उपचारांसाठी दाखल झाला आहे. डोक्याएवढा मोठा ब्रेन ट्युमर पाहून डॉक्टरही अवाक झाले. संतलालच्या डोक्यावर मासाची मोठी गाठ तयार झाली होती. नायर रुग्णालयाच्या मेंदूविकार शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी आणि त्यांच्या टीमने हे शिवधनुष्य पेलले. संतलालची एमआरआय, सीटीस्कॅन तपासणी करण्यात आली. तब्बल सात तासांच्या
गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेनंतर संतलालच्या डोक्यावरची गाठ काढून टाकण्यात आली. अखेर चार वर्षांनंतर संतलालला डोक्याएवढ्या मोठ्या गाठीपासून मुक्ती मिळाली. या शस्रक्रियेविषयी नायर रुग्णालयाच्या मेंदूविकार शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉ. त्रिमुर्ती नाडकर्णी म्हणाले, मेंदूत गाठ असलेले अनेक रुग्ण आपल्याकडे येतात. परंतु, संतलालची केस खूपच वेगळी होती. या तरूणाच्या डोक्यावर डोक्याच्या आकाराची गाठ होती. आम्ही यापूर्वी शस्त्रक्रिया करून अनेक गाठी काढल्यात. पण, या गाठीवर शस्त्रक्रिया करणे खूपच अवघड होते.

डॉ. नाडकर्णी पुढे म्हणतात, डोक्यातील रक्तवाहिन्या या गाठीत पसरल्या होत्या. संतलालची प्रकृती चिंताजनक होती. हिमोग्लोबिन फक्त 7 ग्रॅम इतकेच होते. त्यामुळे तातडीने 11 युनिट रक्त चढवण्यात आले. त्यानंतरच शस्त्रक्रिया करून तब्बल 1.873 किलोची गाठ काढण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर तीन दिवस संतलाल व्हेंटिलेटरवर होता. आता त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले असून
त्यांची प्रकृती उत्तम आहे.

हा ब्रेन ट्युमर साधा आहे किंवा कॅन्सरचा हे तपासण्यासाठी नमुने पाठवण्यात आले असून लवकरच याचा अहवालही प्राप्त होईल, असेही डॉ. नाडकर्णी यांनी सांगितले.संतलालचा भाऊ अखिलेश पाल यांनी सांगितले, 2013 मध्ये संतलालच्या पायाला गाठ आली होती. यावर गावीच उपचार केले. मात्र, त्यानंतर डोक्यात लहानशी गाठ तयार झाली. अनेक वर्ष उपचार सुरू होते. पण काहीच फरक पडला नाही.

डोक्यातील गाठ सतत वाढत होती. आत्तापर्यंत लाखो रूपये खर्च झालेत. प्रकृती खूपच बिघडल्याने मुंबईत आलो. डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे भावाचे प्राण वाचले, नाहीतर आम्ही अपेक्षाच सोडली होती. सध्या भावाला डोळ्यांनी अंधूक दिसत आहे. पण काही दिवसांनी स्पष्ट दिसू लागेल.


रुग्णांना योग्य त्या सोयी-सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही तत्पर असतो. या तरुणाच्या डोक्यातील गाठ प्रचंड मोठी होती. त्यावर शस्त्रक्रिया करणे अवघड होते. परंतु, डॉक्टरांनी योग्य पद्धतीनं ही परिस्थिती हाताळून रुग्णाला नवीन आयुष्य दिले आहे.
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, नायर रुग्णालय