Fri, Jul 19, 2019 19:53होमपेज › Mumbai-Thane-Raigad › नालासोपार्‍यात 20 बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा जप्‍त!

नालासोपार्‍यात 20 बॉम्बसह स्फोटकांचा मोठा साठा जप्‍त!

Published On: Aug 11 2018 1:43AM | Last Updated: Aug 11 2018 1:43AMमुंबई/नालासोपारा : पुढारी वृत्तसेवा

ऐन सणासुदीच्या काळात त्यातही बकरी ईदच्या मुहूर्तावर महाराष्ट्रात घातपात घडवण्याचा मोठा कट महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) गुरुवारी रात्री उघडकीस आणला. नालासोपारा पश्चिमेकडील भंडार आळीत सनातन संस्थेचा कार्यकर्ता वैभव राऊत याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात तब्बल 20 देशी बॉम्ब जप्‍त करण्यात आले, तर जवळच्याच एका दुकानातून आणखी 24 बॉम्ब बनवले जातील एवढी गन पावडर, डिटोनेटर आदी साहित्य हाती लागले. हे भयंकर कारस्थान रचणारा वैभव राऊत आणि त्याचे दोन साथीदार शरद भाऊसाहेब कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या त्रिकुटाला जेरबंद करण्यात आले. तिघांनाही 18 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

मुंबई, पुणे, सातारा आणि सोलापूरमध्ये घातपात करण्याचा कट या आरोपींनी आखला असल्याचे कळते. जप्त केलेली स्फोटके व स्फोटक साहित्य पाहता या तिघांना आणखी पन्नासहून अधिक गावठी बॉम्ब तयार करायचे होते, मात्र त्या आधीच एटीएसचा छापा पडला.जप्त केलेले बॉम्ब कमी तीव्रतेचे आहेत. जप्‍त करण्यात आलेली स्फोटके व त्यासाठीचे साहित्य एटीएसने सांताक्रुज न्यायसहाय्यक प्रयोगशाळेत पाठविले आहे. 

हिंदू संघटनेशी संबंधित कार्यकर्ते आगामी दिवसांत घातपात घडविण्याच्या तयारीत असल्याची माहिती महाराष्ट्र एटीएसला मिळाली होती. संभाव्य घातपाताची सूत्रे नालासोपारा येथून हलविली जात आहे, अशी माहिती प्राप्त होताच एटीएसचे एक विशेष पथक काही दिवसांपासून नालासोपार्‍यात तळ ठोकून होते. एटीएसची एक टीम वैभववर पाळत ठेवून होती. गुरुवारी रात्री नालासोपार्‍याच्या भंडार आळीत वैभव राऊतच्या घरावर छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले. वैभवच्या चौकशीतून इतर दोन साथीदारांचे नाव समोर येताच पुणे आणि नालासोपारा येथून शरद कळसकर आणि सुधन्वा गोंधळेकर या दोघांना पोलिसांनी अटक केली. 

शरदच्या घरातूनही पोलिसांनी काही आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली असून, त्यात बॉम्ब तयार करणे, तसेच त्यासाठी लागणार्‍या वस्तूंचा समावेश आहे. काही नकाशेही अधिकार्‍यांनी ताब्यात घेतले. बॉम्ब बनविण्यासाठी आरोपींनी खास प्रशिक्षण घेतले होते. शरदच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रातून बॉम्ब कशा प्रकारे जोडावेत याची सविस्तर माहिती मिळते. 

पुण्यातून ताब्यात घेतलेल्या सुधन्वा गोंधळेकर हा मूळचा सातारचा आहे. सध्या तो पुण्यात वास्तव्यास होता. त्याने अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम केलेला असून एका हिंदू संघटनेचा पदाधिकारी म्हणून तो काम पाहात होता. 

हिंदू जनजागृतीचा संशय

वैभव राऊत सनातनचा कार्यकर्ता आहे. वैभव हा एक गोरक्षक होता. हिंदू गोवंश रक्षा समितीच्या माध्यमातून तो कार्यरत होता. तो हिंदू जनजागृती समितीच्या सर्व हिंदू संघटनांच्या एकत्रीकरणातून केले जाणारे उपक्रम, आंदोलनात सहभागी होत होता. 

मात्र, गेल्या काही महिन्यांपासून त्याचा कोणत्याही उपक्रमात सहभाग नव्हता, असे हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी स्पष्ट केले आहे. हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना नाहक त्रास देणे, खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवणे यांसारख्या घटना आता नवीन नाहीत. मालेगाव प्रकरण, सनातन संस्थेच्या अनेक निष्पाप साधकांना अटक यांसारख्या प्रकरणांतून हे सिद्ध झाले आहे. आज येत असलेली वृत्ते पाहता वैभव राऊत यांची अटक ही मालेगाव पार्ट 2 आहे की काय, अशी शंका घनवट यांनी व्यक्‍त केली.

विषाच्या बाटलीचे रहस्य

या छाप्यात पोलिसांनी 20 गावठी बॉम्बसह दोन जिलेटीन काड्या, आक्षेपार्ह कागदपत्रे आणि विषाच्या दोन बाटल्या जप्त केल्या. बॉम्बस्फोटासाठी विष वापरले जात नाही, मात्र स्फोटानंतर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याची त्यांची योजना असावी.