Tue, Sep 25, 2018 06:40होमपेज › Mumbai-Thane-Raigad › कल्याणमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

कल्याणमध्ये स्फोटकांचा मोठा साठा जप्त

Published On: Apr 17 2018 2:26AM | Last Updated: Apr 17 2018 2:01AM
डोंबिवली : वार्ताहर

बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेल्या डेक्कन एक्सप्लोटेक कंपनीच्या स्फोटकांसह दोघा तरुणांच्या क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने मुसक्या आवळल्या आहेत. अशोक रामदास ताम्हाणे (28) आणि समीर मारूती धुळे (24) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून हे दोघेही रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातील सावळे गावचे रहिवासी आहेत. हा साठा कल्याण-डोंबिवलीत वितरित करण्याचा दुकलीचा मनसुबा क्राईम ब्रँचने हाणून पाडल्याने घातपाताचा संभाव्य धोका टळला आहे. आरोपींकडे डेक्कन एक्सप्लोटेक कंपनीच्या 119 जिलेटीन ट्यूबसह पांढर्‍या रंगाचे वायरिंग असलेले 100 इलेक्ट्रिक डिटोनेटर आढळून आले आहेत.

बदलापूर पाईपलाईन क्रॉस तळोजा रोडला काही लोक स्फोटकांच्या मोठ्या साठ्यासह येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांना मिळाली होती. त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे, फौजदार नितीन मुदगून, दत्ताराम भोसले, राजेंद्र खिलारे, राजेंद्र घोलप, नरेश जोगमार्गे, सतीश पगारे, अरविंद पवार, विश्वास चव्हाण, प्रकाश पाटील, हरिश्चंद्र बंगारा, विठोबा सूर्यवंशी, बॉम्ब शोधक व नाशक पथक, बॉम्ब स्क्वाडचा टायगर यांच्यासह रविवारी दुपारी 4 वाजल्यापासून या रोडला जाळे पसरले. 4 वाजून 20 मिनिटांनी दोघेजण दुचाकीवर आले. पोलिसांनी या दुकलीला पळून जाण्याआधीच चतुर्भुज केले. या दुकलीच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम 5, 6 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. कल्याण कोर्टात या दोघांना सोमवारी दुपारी हजर करण्यात आले असता कोर्टाने त्याला 4 दिवसांची (20 एप्रिल पर्यंत) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. 

Tags : Mumbai, Large quantities, explosives seized, Kalyan, Mumbai news,