Sat, Jul 20, 2019 23:24होमपेज › Mumbai-Thane-Raigad › माळशेज घाटात दरड कोसळली

माळशेज घाटात दरड कोसळली

Published On: Aug 22 2018 1:37AM | Last Updated: Aug 22 2018 1:04AMमुरबाड : बाळासाहेब भालेराव/जगन्नाथ गायकर

कल्याण-नगर मार्गावरील माळशेज घाटातील बोगद्याजवळ मंगळवारी पहाटे दरड कोसळली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी एका टेम्पोवर दरड कोसळून चालक गंभीर जखमी झाला. अमोल दहिफळे (रा. मोहटादेवी, ता. पाथर्डी, जि.अमहदनगर) असे चालकाचे नाव असून, त्याला आळेफाटा येथील माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून सध्या दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम दीड ते दोन दिवस चालणार आहे. परंतु, घाटात धुके आणि पाऊस असल्याने या कामात अडथळे येत असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी शिवाजी पाटील यांनी दिली आहे.

गेल्या आठवडाभरापासून माळशेज घाटमाथ्यावर पावसाची संततधार सुरू आहे. मंगळवारी पहाटे अडीचच्या सुमारास बोगद्याजवळून आयशर टेम्पो जात असताना पुढील भागावर भलीमोठी दरड कोसळली. यामुळे टेम्पोचा अक्षरशः चक्काचूर होऊन चालक अमोल दहिफळे गंभीर जखमी झाला. दरड कोसळण्याच्या काही मिनिटांपूर्वी प्रवाशांनी भरलेली परिवहन मंडळाची बस याठिकाणाहून मार्गस्थ झाली. ही बस गेल्यानंतर ही घटना घडून गेल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर यांनी घटनास्थळी भेट दिली.

घाटात धुक्याचे प्रमाण व पावसाचा जोरही कायम असल्याने रस्ता सफाईमध्ये अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 13 व 14 जुलै या दोन दिवसांत माळशेज घाटात 2 ठिकाणी दरड कोसळल्या होत्या. त्यामध्ये दोन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. या दोन्ही घटनांच्या 500 मीटर अंतरावरच मंगळवारी पहाटे दरड कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे हा घाट रस्ता दिवसेंदिवस प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने घातक बनत चालला असून, प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी प्रवासी, वाहनचालकांकडून केली जात आहे.