Wed, Mar 20, 2019 03:06होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘भूखंडचा वापर न झाल्यास जागा ताब्यात घेणार’

‘भूखंडचा वापर न झाल्यास जागा ताब्यात घेणार’

Published On: Mar 02 2018 12:49AM | Last Updated: Mar 02 2018 7:24AMमुंबई : प्रतिनिधी

शैक्षणिक व सामाजिक कारणांसाठी देण्यात आलेल्या सरकारी भूखंडांचा वर्षानुवर्षे वापर केला जात नसेल, तसेच भूखंड देताना घालण्यात आलेले नियम व अटींचा भंग करण्यात आला असेल, तर अशा जागा पुन्हा सरकारच्या ताब्यात घेण्यात येतील. अशा जागांचा शोध घेऊन यादी तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. तसेच वांद्रे येथे मराठवाडा मित्रमंडळास वसतिगृह व कम्युनिटी सेंटरसाठी देण्यात आलेली जागा ताब्यात घेण्याबाबत कारवाई सुरू असल्याचे त्यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना स्पष्ट केले.

वांद्रे पूर्व येथे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना मराठवाडा मित्रमंडळास 11 हजार चौ.मीटरचा भूखंड नाममात्र दरात देण्यात आला. मात्र, 30 ते 40 वर्षे होऊनही ज्या कारणासाठी भूखंड आला, त्यासाठी त्याचा उपयोग करण्यात येत नसल्याबाबत शिवसेना गटनेते अ‍ॅड. अनिल परब यांनी प्रश्‍न उपस्थित करत जागा काढून घेण्याची मागणी केली. अशाप्रकारे राज्यात अनेक ठिकाणी सरकारी भूखंड विनावापर पडून असल्याकडे लक्ष वेधत शैक्षणिक व अन्य कारणांसाठी त्या उपयोगात आणण्याची सूचना केली. त्यावर उत्तर देताना महसूलमंत्री पाटील यांनी, ज्या कारणासाठी सरकारी भूखंड दिला असेल, त्याच्या वापराचा आराखडा तीन वर्षांच्या आत तयार करून बांधकाम पूर्ण करणे आवश्यक आहे.