मुंबई : प्रतिनिधी
राज्याच्या पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्र पोलीस दलातील महिला कॉन्स्टेबल ललिता साळवे यांना लिंग बदल करण्यास परवानगी दिली. त्यामुळे ललिता साळवे लवकरच ललित साळवे होणार आहे. लिंग बदल शस्त्रक्रिया करण्यासाठी ललिता मंगळवारी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाल्या आहेत . लवकरच त्यांच्यावर लिंग बदलाची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
माझे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. लवकरच मी ललितापासून ललित बनणार आहे. ज्या दिवसाची मी वाट पाहत होते तो दिवस आता फार दूर नाही, अशा शब्दात कॉन्स्टेबल ललिता साळवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लिंग बदलाची शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी त्या अनेक महिन्यांपासून परवानगीच्या प्रतीक्षेत होत्या. त्यांना पोलीस महासंचालकांकडून नुकतीच शस्त्रक्रियेची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार ललितावर सध्या मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांच्यासोबत मामा आणि भाऊ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल झाले आहेत. मात्र लिंग बदलाची शस्त्रक्रिया कधी होणार याबाबत अद्यापही तारीख ठरवण्यात आलेली नाही.
सेंट जॉर्ज रुग्णालय प्रशासनाकडून ललिताला विशेष सेवा पुरवण्यात येत आहेत. ललितावर सध्या रुग्णालयातील तळमजल्यावरील एका स्वतंत्र खोलीत उपचार सुरू आहेत. सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या प्लास्टिक सर्जरी विभागाचे डॉक्टर रजत कपूर ललितावर लिंग परिवर्तनाची शस्त्रक्रिया कऱणार आहेत. या संदर्भात ‘पुढारी’शी बोलताना डॉ. कपूर म्हणाले की, ललिताची लिंग बदल शस्त्रक्रिया कधी करायची याबाबत अजून विचार झालेला नाही. कारण अशी शस्त्रक्रिया करण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) ची परवानगी गरजेची असते. त्यानंतरच आम्ही ही शस्त्रक्रिया करू. पण त्यापूर्वी ललिता यांच्या जेनेटिक आणि काही रक्त चाचण्या करण्यात येतील. या चाचणीचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर शस्त्रक्रियेसाठी कोणत्या गोष्टी लागतील आणि ही शस्त्रक्रिया कशाप्रकारे करता येईल, याचा अंदाज घेता येईल.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी ललिता यांची मानसिक व शारीरिक चाचण्या केल्या जातील. त्यानंतरच शस्त्रक्रिया केली जाईल. लिंगबदला संदर्भात मुख्यमंत्र्यांनी ललिताबाबत सहानुभूतीने विचार करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते. त्यानुसार सोमवारी पोलीस महासंचालकांनी ललिताच्या लिंगपरिवर्तनाच्या शस्त्रक्रियेला परवानगी दिली होती.