Tue, Nov 20, 2018 06:11होमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईचा राजा यंदा सूर्यमंदिरात 

मुंबईचा राजा यंदा सूर्यमंदिरात 

Published On: Jul 29 2018 1:23AM | Last Updated: Jul 29 2018 1:06AMमुंबई : प्रतिनिधी 

गणेशोत्सव काही महिन्यांवर आला असून गुरुपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर लालबागमधील प्रसिद्ध अशा गणेशगल्लीच्या म्हणजेच मुंबईचा राजा असा मान मिळविलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला. पाद्यपूजनाच्या धार्मिक विधी पूर्ण झाल्यावर ढोल-ताशा पथकांचा जल्लोष गणेशगल्लीत साजरा करण्यात आला. 

यंदा या मंडळाचे 91 वे वर्ष असून उंच मूर्ती आणि भव्यदिव्य देखाव्यासाठी गणेशगल्लीचा बाप्पा पाहण्यासाठी भाविकांची रीघ लागते. यावर्षी या मंडळाकडे भाविकांकडून आलेल्या मागणीनुसार बाप्पाची उभी आकर्षक अशी 22 फुटी मूर्ती घडविण्याचे काम शनिवारपासून झाले. मूर्तिकार सतीश वळवडीकर हे ही भव्यदिव्य गणरायाची मूर्ती साकारणार आहेत. यंदा मुंबईचा राजा मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेरच्या सूर्यमंदिरात विराजमान होणार आहे. सूर्यमंदिर हे नवग्रह मंदिर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. या मंदिराची प्रतिकृती यंदा मंडळातर्फे साकारण्यात येणार आहे. 

हा देखावा कलादिग्दर्शक अमन विदाते साकारणार असून जे भाविक त्या ठिकाणी जाऊन मंदिरे पाहू शकत नाहीत. त्यांच्यासाठी प्रतिकृती आम्ही साकारतो. जेणेकरून मुंबईतच त्यांना भारताच्या विविध भागांत असलेल्या धार्मिक स्थळांचे दर्शन होईल असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. गणेशगल्लीत आकर्षण असते ते अतिशय सुंदर अशा देखाव्याचे. 1928 साली स्थापना झालेल्या या मंडळाने भारतातील विविध मंदिरे साकारलेली आहे. मीनाक्षी मंदिर, त्रिपुरम सुवर्णमंदिर, बद्रीनाथ, केदारनाथ, पशुपतीनाथ, स्वामीनारायण, सोमनाथ अशी भव्य मंदिरे आणि हवामहाल आदी देखावे या मंडळाने साकारलेले आहेत.