Mon, Sep 24, 2018 03:17होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लक्षवेधी लावल्याने धमकी; अन्‍नसुरक्षा अधिकारी निलंबित

लक्षवेधी लावल्याने धमकी; अन्‍नसुरक्षा अधिकारी निलंबित

Published On: Mar 17 2018 2:01AM | Last Updated: Mar 17 2018 1:57AMमुंबई : प्रतिनिधी

गुटखा विक्रीसंदर्भात विधिमंडळाच्या अधिवेशनात लक्षवेधी लावली म्हणून अन्‍न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकार्‍यानेच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात जाऊन धमकावल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी अन्‍नसुरक्षा अधिकारी आर. डी. आकरूपे यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा अन्‍न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट यांनी विधान परिषदेत केली.

गुटखाबंदीचा प्रश्‍न उपस्थित करत एका प्रकरणात कारवाईची मागणी केल्याने, संतप्त झालेले आकरूपे हे उदगीर येथील भाजप आमदारासोबत विधान मंडळात आले होते. या अधिकार्‍याने गुटख्याची लक्षवेधी का लावली, असे विचारत आपले विशेषकार्य अधिकारी यांना धमकी दिल्याचा मुद्दा धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत उपस्थित केला.

लोकहिताच्या प्रश्‍नावर आवाज उठवला म्हणून विधिमंडळात येऊन जर अशाप्रकारे कोण धमकावणार असेल, तर त्याची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकार्‍याला तत्काळ निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.

Tags : mumbai, mumbai news, Legislative Council, SESSION, Food Security Officer, Suspended,