Tue, Nov 20, 2018 11:08होमपेज › Mumbai-Thane-Raigad › लेडिज स्पेशल माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये!

लेडिज स्पेशल माटुंगा स्थानक लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये!

Published On: Jan 11 2018 1:30AM | Last Updated: Jan 11 2018 1:00AM

बुकमार्क करा
मुंबई : पुढारी वृत्तसेवा

रेल्वेस्थानकाचे व्यवस्थापन, सुरक्षा, उद्घोषणांपासून सर्वच कामांमध्ये पूर्णतः महिला अधिकारी-कर्मचार्‍यांचा सहभाग असणारे देशातील एकमेव स्थानक म्हणून माटुंगा स्थानक ओळखले जाते. या गौरवास्पद कामगिरीची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने दखल घेतली असून, देशातील पहिले महिला संचालित स्थानक म्हणून या बुकात नोंद करण्यात आली आहे. याबाबत दै. पुढारीने सर्वप्रथम वृत्त दिले होते.

जुलै 2017 मध्ये माटुंगा स्थानकात सर्वच पदांवर महिला कर्मचारी-अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी ही संकल्पना मांडली. त्यानंतर स्थानक अधीक्षक, तिकीट प्रणाली, तिकीट तपासनीस, उद्घोषणा, सुरक्षा पथक आदी सार्‍याच पदांवर महिला अधिकारी-कर्मचारी नेमण्यात आले. या सहा महिन्यांत माटुंगा स्थानकाने उत्तम कामगिरी पार पाडली आहे. येथे स्थानक अधीक्षक, 11 तिकीट बुकिंग क्लार्क, सात तिकीट तपासनीस, रेल्वे सुरक्षा पथकाच्या (आरपीएफ) पाच काँस्टेबल, उद्घोषिका आदी 34 जणांचा चमू नियुक्त करण्यात आला आहे.

ममता कुलकर्णी या स्थानक अधीक्षक म्हणून काम पाहतात. 1992 मध्ये मध्य रेल्वे विभागातील पहिल्या महिला स्थानक अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. मुंबईतील विविध स्थानकांत कर्तव्य बजाविणार्‍या कुलकर्णी यांच्या गाठीशी 30 वर्षांचा अनुभव आहे. अस्मिता मांजरेकर या फुकट्या प्रवाशांना रोखणार्‍या तिकीट तपासनीस पथकाचे नेतृत्त्व करतात. त्यांच्या पथकात जयश्री माने, राधिका निबंडकर आदी सहकारी आहेत.