Mon, May 27, 2019 08:15होमपेज › Mumbai-Thane-Raigad › ऊर्जाबचतीसाठी रस्त्यांवर एलईडी दिवे बसवणार : मुख्यमंत्री

ऊर्जाबचतीसाठी रस्त्यांवर एलईडी दिवे बसवणार : मुख्यमंत्री

Published On: Feb 15 2018 1:57AM | Last Updated: Feb 15 2018 1:17AMमुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व नगपरिषदांच्या क्षेत्रात ऊर्जा बचतीसाठी रस्त्यांवर एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत. ईईएसएलच्या स्ट्रीट लाईटिंग नॅशनल प्रोग्रॅम अंतर्गत राज्यातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सुमारे 20 लाख एलईडी दिवे लावले जातील. यामधून 500 मेगावॅट वीज बचत होणार असून वीज बिलात किमान 50 टक्क्यांनी घट होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यांवरचे जुने पारंपरिक दिवे बदलून नवीन एलईडी दिवे लावण्यासाठी एनर्जी एफिशिएन्सी सर्व्हिसेस लिमिटेड ( ईईएसएल) व नगरविकास विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी सामंजस्य करार झाला. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ईईएसएलचे व्यवस्थापकीय संचालक सौरभकुमार यावेळी उपस्थित होते.

स्ट्रीट लाईटिंग नॅशनल प्रोग्रॅम अंतर्गत सध्याचे सोडियम व्हेपर, मर्क्युरी व्हेपर दिवे बदलून तिथे एलईडी दिवे लावले जातील. तसेच या दिव्यांची पुढील सात वर्षे देखभाल केली जाईल. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि नांदेड या प्रमुख शहरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. 394 शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना टप्प्याटप्याने या योजनेचा लाभ मिळेल. शहरांतील प्रमुख रस्त्यांवर सुमारे 20 लाख एलईडी दिवे लावले जातील.